सेन्सॉरने ‘फुले’ चित्रपटात सुचवले 12 बदल, सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते जयंत पाटील यांचा टोला

थोर समाजसेवक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आधी ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतल्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले. आता सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत ती दृश्ये हटवण्यास आणि काही दृश्यांमध्ये बदल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्डावर संताप व्यक्त होत आहे.

देशातील माता-भगिनींना शिक्षणाचे दार खुले करून देणाऱ्या महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचा जीवनप्रवास राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ या चित्रपटात मांडला आहे. या चित्रपटात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा मुख्य भूमिकेत आहेत. आता हा चित्रपट वेगळय़ाच कारणामुळे चर्चेत आला आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या निर्मात्यांना 12 बदल सुचवले आहेत. त्यात काही संवाद वगळण्याची, काही संवाद लहान करण्याची आणि ऐतिहासिक संदर्भ आणि उपशीर्षकांमध्ये बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.

z चित्रपटाच्या सुरुवातीला दिलेल्या डिस्क्लेमरचा स्क्रीन टाईम वाढवावा, चित्रपटातील एक दृश्यात एक माणूस झाडू मारत आहे आणि काही मुले सावित्रीमाईंवर शेण फेकत आहेत ही दृश्ये बदलावी, चित्रपटातील ‘शूद्राने झाडू बांधून चालावे…’ हे वाक्य ‘आपण अशाच प्रकारे सर्वांपासून अंतर राखले पाहिजे का ?’ असा सुधारित बदल करण्यास सांगितले आहे. एका संवादात ‘3000 वर्षे जुनी…गुलामगिरी…’ ऐवजी ‘ती अनेक वर्षे जुनी आहे…’ असा शब्द वापरायला हवा, ‘मांग’, ‘महार’ यांसारखे शब्द ‘ऐसी छोटी छोटी जाती’ बदलावे, अशा सूचना सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना दिल्या आहेत.

या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सेन्सॉर बोर्डावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘कश्मीर फाईल्स’, ‘केरळ फाईल्स’सारख्या प्रपोगंडावर आधारित चित्रपटांवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही, मात्र ‘फुले’सारख्या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. कोण आहेत नामदेव ढसाळ? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोक बसतात याची कल्पना आली होती. पण आता ‘फुले’ चित्रपटावर आक्षेप घेतल्याने सेन्सॉरची मानसिकता लक्षात येते, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.