>> बद्रीनाथ खंडागळे
जायकवाडी धरणाचे 27 पैकी 18 दरवाजे आजपासून 3 फुट वर करून तब्बल 56 हजार 542 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे ! गोदावरी नदीच्या पात्रातून हा अजस्त्र जलौघ नांदेड पर्यंत झेपावला आहे. जलसंपदा विभागाने गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दि. 25 सप्टेंबर रोजी धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडण्यात आले. सुरुवातीला 12 तर नंतरच्या टप्प्यात आणखी 6 दरवाजे प्रत्येकी अर्धा फूट उघडून कमीअधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. तथापि नगर व नाशिक भागातील धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक वाढतच चालली असल्याने गुरुवारी जायकवाडी धरणाच्या विसर्गात वाढ करण्यात आली. 27 पैकी 18 दरवाजे टप्प्याटप्प्याने प्रत्येकी 3 फूट वर करण्यात आले आहेत. यातून 56 हजार 592 क्युसेक्स याप्रमाणे जलविसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात झेपावत आहे.
या पार्श्वभूमीवर जायकवाडी धरणाच्या खाली असलेला गोदावरी वरील छोटा पुल पाण्याखाली गेला आहे. नदिचा जलफुगवटा वाढल्याने छत्रपती संभाजीनगर, नगर, बीड, धाराशिव, परभणी व नांदेड जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. काठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.