![jaya bachchan](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/jaya-bachchan-696x447.jpg)
समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत चित्रपट उद्योगाचा मुद्दा उपस्थित केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 वरील सर्वसाधारण चर्चेदरम्यान त्यांनी सरकारवर चित्रपट उद्योग उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना चित्रपट उद्योगाला मदत करण्याचे आवाहन करण्यात केलं आहे.
काय म्हणाल्या जया बच्चन?
राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेदरम्यान बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, ‘तुम्ही एका उद्योगाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. सरकारे हे पूर्वीही करत आली आहेत. मात्र आता ते प्रमाणात होत आहे. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही त्यांना (चित्रपट उद्योजकांना) बोलावता. त्यांच्यासोबत फोटो काढतात आणि नंतर त्याकडे दुर्लक्ष करतात. चित्रपट उद्योगाबद्दल तुमचे काय मत होते? जीएसटी बाजूला ठेवा. परिस्थिती इतकी वाईट आहे की, सर्व सिंगल स्क्रीन बंद करण्यात आल्या आहेत. लोक छोट्या पडद्यावर चित्रपट पाहण्यासाठी जात नाहीत. कारण सगळंच खूप महाग झालं आहे. तुम्हाला हा उद्योग संपवायचा आहे का?”
सरकारवर आरोप करत जया बच्चन म्हणाल्या की, ”आजचे सरकार उद्योग पूर्णपणे नष्ट करू इच्छित आहे. हा एकमेव उद्योग आहे जो हिंदुस्थानला उर्वरित जगाशी जोडतो. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचे जगणे कठीण झाले आहे. मी चित्रपट उद्योजकांच्या वतीने बोलत आहे. मी सरकारला चित्रपट उद्योगावर दया दाखवण्याचे आवाहन करत आहे. मी अर्थमंत्र्यांना याचा विचार करण्याची आणि चित्रपट उद्योगाला मदत करण्याची विनंती करते.”