तानाजी सावंतांना मोठा धक्का! सुरेश कांबळे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांना जाहीर पाठींबा

विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंतांना मोठा धक्का बसला असून जय हनुमान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी परंडा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांना जाहीर पाठींबा दिला आहे.

शनिवार, 16 नोव्हेंबर रोजी परंडा शहरातील प्रितम मंगल कार्यालय येथे उषाताई सुरेश कांबळे यांच्या उपस्थितीत जय हनुमान ग्रुपच्या कार्यकर्त्याचा संवाद व निर्धार मेळावा घेण्यात आला. या निर्धार मेळाव्यासाठी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांना जय हनुमान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी ऑनलाईन संवाद साधून महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांना पाठींबा जाहीर करत 50 हजार मतांची आघाडी देण्याचे कार्यकर्त्यांना अवाहन केले.

यावेळी कार्यकर्त्याशी ऑनलाईन संवाद साधताना सुरेश कांबळे म्हणाले की, मी ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यांनी मला जाणीवपूर्वक अडचणीत आणयास सांगीतले. मी संकटात असताना स्व.ज्ञानेश्वर पाटील व राहुल मोटे यांनी मला साथ दिली मात्र, मी ज्याच्यासाठी राजकारण, समाजकारण करत होतो. त्यांनी मला खोट्या गुन्ह्यात गुंतवले आहे. त्यामुळे मी मागील 18 महिन्यांपासून मा‍झ्या कुटुंबापासून दूर आहे. या संकट काळात मला स्व. ज्ञानेश्वर पाटील धिर देण्यासाठी भेटणार होते. मात्र, काही कारणास्तव माझी त्यांच्याशी भेट झाली नाही. कालांतराने त्यांचे दुख:द निधन झाले. मात्र, माझ्यावर ओढवलेल्या संकटामुळे मला त्यांच्या कुटुंबाची भेट घेता आली नाही. पण मी आज तुमच्या साक्षीने स्व. ज्ञानेश्वर पाटील यांना शब्द देतोय मी मोठा भाऊ म्हणून रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांना लहान भावा प्रमाणे साथ देईन असा शब्द देऊन महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांना 50 हजार मतांच्या मताधिक्याने निवडून द्या, असे अवाहन कांबळे यांनी जय हनुमान ग्रुपच्या सदस्यांना केले.

यावेळी उषाताई सुरेश कांबळे, प्रतिक कांबळे यांनी कांबळे कुटुंबावर ओढवलेल्या संकटाचा पाढा ग्रुपच्या सदस्यांना वाचून दाखवत सुरेश भाऊ कांबळे यांनी सांगीतल्याप्रमाने महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांना येणाऱ्या 20 तारखेला मतदान करून विजयी करा असे कार्यकर्त्यांना आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ देवकर सर यांनी केले तर आभार प्रतिक कांबळे यांनी मानले. यावेळी परंडा, भुम, वाशी, विधानसभा मतदार संघातील हजारो जय हनुमान ग्रुपचे कार्यकर्ते, माहिला उपस्थित होत्या.