ताडदेवकरांनी अनुभवला स्वागत यात्रेचा जल्लोष

जय भवानी प्रतिष्ठान व शिवसेना यांच्या वतीने ताडदेवमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या भव्य दर्शनाने ताडदेवकरांनी मराठी संस्कृतीची भव्यता अनुभवली.

छत्रपती शिवराय व त्यांचे अष्टप्रधान मंडळाचा सुंदर चित्ररथ आणि सोबत रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे फडकवणारे शेकडो मावळे यांनी वातावरण शिवमय झाले होते. सकाळी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या 51 फुटी गुढीची पूजा करून नाना चौकातून यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. प्रभू श्रीरामांचा भव्य पुतळा लोकांचे लक्ष वेधून घेत होता. महिलांच्या लेझीम पथकाने यात्रा मार्गावर लेझीमची प्रात्यक्षिके दाखवून लोकांची मने जिंकली. पारंपरिक नमन त्यांच्या लोकगीतांच्या चालीवर सादर करण्यात आले. नालासोपाऱ्याच्या जय शिवबा या दांडपट्टा पथकाने थरारक युद्धकला पेश करून वातावरण शिवमय केले. दुपारी ताडदेवच्या हनुमान मंदिरात हजारो भाविकांनी महाआरती करून यात्रेचा समारोप केला. या स्वागत यात्रेचे आयोजक व शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांनी यात्रेचे महत्त्व विशद करून उपस्थितांचे आभार मानले.