बुमराचे पुनरागमन लांबणीवर

मुंबई इंडियन्सचा हुकमाचा एक्का जसप्रीत बुमराच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुमरा आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. बुमरा या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी असल्याने मुंबईसाठी हा धक्का आहे, मात्र बुमरा मैदानात परतण्याच्या तयारीत असून त्याने नुकतंच बंगळुरुतील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलेन्समध्ये गोलंदाजीचा वर्कलोड वाढवला आहे. बुमराचे पुनरागमन लांबणीवर पडले असले तरी तो येत्या आठवडाभरात मुंबईसाठी गोलंदाजी करताना दिसू शकतो. बुमरा जानेवारीपासून पाठीच्या दुखापतीमुळे मैदानापासून दूर आहे. त्यामुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेलादेखील मुकला होता. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला जानेवारीच्या सुरुवातीपासून पाच आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला होता. बीसीसीआयच्या वैद्यकीय कर्मचाऱयांकडून परवानगी मिळाल्यानंतरच त्याला मुंबईच्या संघात सामील होण्याची परवानगी मिळणार आहे. बुमरा 28 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेवर लक्ष ठेवून आहे.