टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आयसीसी कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी क्रमवारीत 907 रेटिंग गुण मिळविणारा पहिला हिंदुस्थानी गोलंदाज ठरलाय. आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत त्याने हा नवा विक्रम केला. बुमराने मागील आठवडय़ात 904 रेटिंगसह रविचंद्रन अश्विनच्या विक्रमाची बरोबरी केली होती. आता विक्रमी 907 रेटिंगसह तो गोलंदाजी क्रमवारीत ‘नंबर वन’च्या सिंहासनावर विराजमान आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर (बॉगाक) ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमरा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होय. त्याने आतापर्यंत झालेल्या 4 कसोटी सामन्यांत 12.83 च्या सरासरीने 30 विकेट टिपल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड 843 रेटिंगसह दुसऱया, तर कर्णधार पॅट कमिन्स 837 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे.
जैसवालला एका स्थानाचा फायदा
मेलबर्न कसोटीत दोन्ही डावांत अर्थशतक ठोकणारा हिंदुस्थानचा सलामीवीर यशस्वी जैसवालला ताज्या क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झालाय. तो आता 854 गुणांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचलाय. त्याने ऑस्ट्रेलियाच्या ट्रव्हिस हेडला मागे टाकले. इंग्लंडचा जो रूट अव्वल स्थानावर कायम असून त्याचा संघसहकारी हॅरी ब्रुक दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा केन विल्यम्सनही तिसऱ्या स्थानावर कायम आहे. स्थानावर आहे.