जरांगे पाटील यांच्या पदयात्रेसाठी पाथर्डीत जोरदार तयारी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी चलो मुंबई असा नारा देत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी सुरु केलेली पदयात्रा येत्या रविवारी नगर जिल्ह्यात असलेल्या पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे येत आहे. या यात्रेच्या स्वागतासाठी व यात्रेत सहभागी झालेल्या आंदोलकांची व्यवस्था करण्याची मोठी जय्यत तयारी सकल मराठा समाज बांधवानी केली आहे.

या यात्रेच्या वेळी ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात येणार आहे. अंतरवाली सराटी येथून 20 तारखेला जरांगे आपल्या आंदोलनाला सुरवात करणार असून पहिल्या दिवशी त्यांचा मुक्काम हा शिरूर तालुक्यातील मातोरी येथे असणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता या यात्रेचे आगमन तालुक्यातील मिडसांगवी येथे होणार आहे. या यात्रेत मोठ्या संख्यने आंदोलक सहभागी होणार असल्याने या आंदोलकांची जेवणाची सोय ही तालुक्यातील आगासखांड येथे दुपारी करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणची शेकडो एकर जमीन 23 जेसीबीच्या साहाय्याने साफ करण्यात आली असून आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांना जेवण देण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातून वर्गणी व घराघरातून भाकरी बनवून घेण्यात येणार आहे.

ज्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे त्या ठिकाणी शिंगोरी आमटी बनवण्यात येणार असून काही गावातून लापशी व कढी बनवून ग्रामस्थ भोजनाच्या ठिकाणी येणार आहेत. जरांगे यांच्या या आंदोलनात तालुक्यातील काही तरुण सहभागी होऊन मुंबईला सुद्धा जाणार असून त्या साठी सध्या नावनोंदणी सुरु करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी भोजनाची, निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्या ठिकाणाची आमदार मोनिका राजळे यांनी कार्यकर्त्यांसह पाहणी केली आहे तर राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांनी सुद्धा ही यात्रा नगर जिल्ह्यात जोपर्यंत आहे, तोपर्यंत आंदोलकांना सर्व प्रकारच्या सुविधा आपण देणार असल्याचे जाहीर केले आहे.

21 तारखेला या यात्रेचा मुक्काम हा बाराबाभळी या ठिकाणी होणार असून मिडसांगवी ते बाराबाभळी या 70 किमी अंतरात येणाऱ्या तालुक्यातील सर्व गावात ठिकठिकाणी जरांगे यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले असून अनेक ठिकाणी जरांगे यांचे जे सी बी ने फुले उधळून स्वागत केले जाणार आहे. ही यात्रा सुरळीत पार पाडावी या साठी स्थानिक पोलीस प्रशासनाने 200 पोलीस कर्मचारी, 30 अधिकारी, एसआरपीच्या दोन तुकड्या मिळाव्यात अशी मागणी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली आहे तर यात्रा मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये या साठी बीडहून पाथर्डी मार्गे जाणारी वाहतूक दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात आली असून नगर ते पाथर्डी या मार्गावरची वाहतूक सुद्धा वेळप्रसंगी बदलण्यात येणार आहे. जरांगे यांची पदयात्रा यशस्वी व्हावी या साठी सकल मराठा समाज कार्यकर्त्यांच्या अनेक बैठका होऊन योग्य ते नियोजन करण्यात आले आहे तर या यात्रेच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्यने नागरिक जमा होणार असल्याने या यात्रेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.