संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार आरोपीला धनंजय मुंडेनी लपवले असेल; मनोज जरांगे यांचा पुन्हा निशाणा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आम्ही लावून धरणार आहोत. समाज आमच्या बाजूने आहे. देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत आहे, न्यायासाठी वणवण फिरत आहे. त्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. देशमुख कुटुंब साधंभोळं कुटुंब आहे. मात्र, माझे आणि आपल्या समाजाचे सर्व घटनांवर लक्ष आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच पुन्हा एकदा त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

या प्रकरणातील आरोपींमधला गाडीवाला कुठं आहे? फरार आरोपी इथंच असायला पाहिजे बीड, नगर, बुलढाणा- सिन्नर या भागात असेल. त्याला धनंजय मुंडे यांनी लपवून ठेवला असेल, असा आरोपही जरांगे यांनी केला. देशमुख यांना धमकी देणार कुठे आहेत, घर देणारा, पैसे देणाऱ्यांना सहआरोपी केलं का? असा सवालही जरांगे यांनी केला आहे. देशमुख कुटुंबियांनी सरकारवर आणि होणाऱ्या चौकशीवर विश्वास ठेवला आहे. त्यांचा गैरफायदा घेऊ नका, असा इशाराही जरांगे यांनी दिला. या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये, असेही ते म्हणाले.

आतापर्यंत आपण रुग्णालयात होतो. आज रुग्णालयातून सुट्टी झाली आहे. आता त्यांची भेट घेणार आहे. झाली आहे. हे प्रकरण आम्ही दाबू देणार नही, देशमुख कटुंबाला न्याय मिळेपर्यंत हे प्रकरण लावून धरणार आहोत. देशमुख कुटंबियांच्या पाठीशी समाज आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे की, कारवाई कधी होईल. शोध सुरू असलेला मोबाईल कधी मिळणार?, आम्हाला तर शंका आहे धनंजय मुंडेच्या घरी मोबाईल ठेवला का? असे सवाल करत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला.