20 व्या शतकात विज्ञानाने भरपूर प्रगती केली आहे. विशेषतः आरोग्य क्षेत्रात विज्ञानाने कठीण समस्या सोडवण्यात मोठे यश मिळवले आहे. अनेक आजारांवर मात करणारी औषधे, शस्त्रक्रिया यांचा शोध लावण्यात वैज्ञानिकांना मोठे यश आले आहे. अशातच जपानमध्यील स्टार्टअप PorMedTech ने अनुवांशिकरित्या सुधारित डुकराच्या किडनीचे माकडात यशस्वीरित्या ट्रान्सप्लांट केली. अशा प्रकारची शस्त्रक्रिया जपानमध्ये पहिल्यांदाच घडली आहे. त्यामुळे भविष्यात प्राण्यांच्या शरीराच्या अवयवांचा मानवांमध्ये वापर करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
कागोशिमा विद्यापीठाच्या हिसाशी सहारा आणि क्योटो प्रीफेक्चरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनच्या मासायोशी ओकुमी यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने प्रक्रिया पार पाडली आहे. एका 7 वर्षाच्या माकडाला डुकराची किडनी लावण्यात आली आहे. एका अडीच महिन्यांच्या डुकराकडून किडनी मिळाली होती. डुकराच्या जनुकांमध्ये अनेक बदल करण्यात आले. त्यामुळे व्हायरसच्या संसर्गाचा धोकाकमी करता येईल.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर माकडाची प्रकृती उत्तम असल्याचे संशोधकांनी सांगितले. तसेच त्याचे मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत आहेत. आम्ही झेनोट्रांसप्लांटेशनच्या क्षेत्रात अशीच प्रगती करत राहू इच्छितो. त्यामुळे अनेक सजीवांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. यासाठी आमची टीम जोमाने कामाला लागली आहे, असे एका संशोधकाने सांगितले.
PorMedTech ने फेब्रुवारी 2024 पासून 39 डोनर डुकरांची निर्मिती केली आहे. ही प्रक्रिया यूएस-आधारित बायोटेक स्टार्टअप इजेनेसिसच्या पेशी वापरून पूर्ण करण्यात आली. अनुवांशिकरित्या तयार केलेले भ्रूण सरोगेट मदर डुकरांमध्ये हस्तांतरित करून क्लोन केलेली पिले तयार करण्यात आली आहेत. या संशोधनामुळे झेनोट्रान्सप्लांटेशनच्या क्षेत्रात नवीन प्रयोगांना उभारी आली आहे. येणाऱ्या काळात हे तंत्रज्ञान मानवी शरीरातील अवयवांची कमतरता दूर करून गंभीर आजारांवर उपाय शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.