
मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम 14 वर्षांपासून रखडले असून दरवर्षी बोलघेवडे सरकार तारीख पे तारीख देत आहे. खोके सरकारच्या या पापामुळे महामार्गावर मागील 14 वर्षांत झालेल्या 5 हजार अपघातांत 1 हजारहून अधिक प्रवाशांचा बळी गेला आहे. मात्र त्यानंतरही मुर्दाड यंत्रणेला जाग येत नसल्याने चाकरमानी 13 मार्च रोजी महामार्गावर ‘शिमगा’ करणार आहेत. जनआक्रोश समिती माणगाव येथे हे आंदोलन करत लटकलेली कामे लवकर पूर्ण करण्यासाठी गाऱ्हाणे घालणार आहे.
2011 मध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र महामार्गावरील ठिकठिकाणी बायपास, उड्डाणपूल, पूल, मोऱ्यांची कामे रखडली आहेत. काही ठिकाणी महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या महामार्गावर मागील 14 वर्षांत 5 हजार 61 अपघात झाले असून त्यामध्ये 1 हजार 229 जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे जनतेत रोष असून 13 मार्च रोजी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या माध्यमातून महामार्गावरील माणगाव बस स्थानक येथे ‘शिमगा उत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. यावेळी रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच पूर्णत्वास येवो, असे गान्हाणे मांडले जाणार आहे.
महामार्ग कामाची सध्याची स्थिती
पळस्पे ते कासूदरम्यानच्या गोव्याकडील एका मार्गिकेच्या काँक्रीटीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. तर कासू ते इंदापूर मार्गिकेच्या कामाला अजूनही गती मिळालेली नाही. महामार्गावरील सर्वात खराब रस्ता याच टप्प्यात आहे. इंदापूर ते वडपाले 25 किलोमीटरपैकी सुमारे 17 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. वडपाले ते भोगाव आणि भोगाव ते कशेडी मार्गातील एका मार्गिकेचे काम झाले आहे. कशेडी ते परशुराम घाट टप्प्यातील परशुराम घाटातील काम शिल्लक आहे. आरवली ते काटे आणि काटे ते वाकेड टप्प्यातील काम रखडलेले आहे. तर वाकेड ते झारापदरम्यानचे काम पूर्ण झाले आहे. तसेच नागोठणे, रातवड, इंदापूर, माणगाव, काळ नदी, गोद नदी आणि लोणेरे येथील पुलांची बांधकामे रखडलेल्या अवस्थेत आहेत. तसेच सुमारे 25 अरुंद मोऱ्यांची बांधकामे सुरूच झालेली नाहीत.
आंदोलनाला शिवसेनाचा पाठिंबा
रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गामुळे कोकणातील चाकरमान्यांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. होळी व गणेशोत्सवासाठी गावी जाणारे चाकरमानी दरवर्षी वाहतूककोंडीत अडकतात. यामुळे मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या माध्यमातून गुरुवारी मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव बस स्थानक येथे सायंकाळी ५ वाजता ‘शिमगा उत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे, अशी माहिती दक्षिण रायगड जिल्हासंपर्कप्रमुख नागेंद्र राठोड यांनी दिली