हमारे आदिलने इन्साफ किया है…

>> प्रभा कुडके

कश्मीर खोऱ्यातील बहुतांशी गावं ही एकमेकांशी संलग्न असलेले व्यवसाय करतात. त्यातीलच एक गाव हापतनार. या गावातील सर्वजण हे पोनी चालवण्याचं काम करतात. हापतनार हे गाव सध्या मीडियाच्या केंद्रस्थानी आहे. याच गावात राहत होता आदिल सय्यद शाह. 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आदिलने, जवळपास 100 पर्यटकांचे प्राण वाचवले होते. पर्यटकांचे प्राण वाचवताना आदिलचा मृत्यू झाला होता.

आदिलच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी हापतनार या गावात जायचं ठरवलं. आदिलच्या घरी पोहोचल्यानंतर आदिलचे वडील सय्यद शाह भेटले. त्यांच्यासोबतच्या बोलण्यातून त्या हल्ल्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘सामना’ सोबत बोलताना ते म्हणाले, नेहमीप्रमाणे आदिल त्या दिवशी सकाळी 8 वाजता बाहेर पडला. साधारण दीडच्या सुमारास बैसरनमध्ये हल्ला झाल्याची बातमी आली. घरातील सर्वांनी आदिलला फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा फोन बंद होता.

संपर्क झाल्यानंतर वाईट बातमी मिळाली, तिथेच पूर्ण घर कोलमडलं. त्या दिवशी आदिलसोबत 25 जणांचा ग्रुप होता. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर आदिलने महिलांना-मुलांना पळण्याची वाट दाखवली. अनेकांना त्याने उचलून तिथल्या वाटेवरून पळत नेले. तिथे असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला पळायला सांगितले. पण आदिल म्हणाला, मी माझा ग्रुप सोडून पळणार नाही. त्याने दहशतवाद्यांकडून बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिथेच हल्लेखोरांनी त्याला छातीत आणि मानेत तीन गोळ्या झाडल्या.

28 वर्षांचा आदिल हा कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. त्याची दिवसाची कमाई ही तीनशे रुपये इतकी होती. यावरच या कुटुंबाची गुजराण चालत असे. कमावता हात जग सोडून गेल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आदिलचे वडील हे सर्व सांगत असताना, मध्येच स्तब्ध झाले त्यांनी मला म्हंटलं, मॅडम आपको पता हैं आदिल का मतलब हैं इन्साफ…. आमच्या मुलाने स्वतःच्या प्राणाची बाजी लावून पर्यटकांचा जीव वाचवून इन्साफ केला आहे. तो गेला हे दुःख कायम असेलच, मात्र त्याने पर्यटकांना वाचवताना धर्म पाहिला नाही, याचा आम्हाला अभिमान आहे.

आदिलच्या आईशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्या केवळ शून्यात एकटक नजर लावून बसल्या होत्या. तिथून निघताना आदिलची छोटी बहीण ओक्साबोक्शी रडत होती… भाई ने किसी का क्या बिगाडा था….