जम्मू-कश्मिरात मुस्लिमांच्या मतांसाठी भाजपने हिंदुत्वाचे सोवळे खुंटीला टांगून ठेवले आहे. ईद तसेच मोहरमला दोन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेंढर येथे जाहीर सभेत केली. ईद आणि मोहरमला आता भाजपच्या गॅस सिलिंडरवर बिर्याणी शिजणार आहे!
जम्मू-कश्मिरातील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मेंढर येथे जाहीर सभा झाली. या सभेत चोवीस तास हिंदुत्वाचे ढोल बडवणाऱ्या भाजपने मुस्लिम मतांसाठी अक्षरशः लोटांगण घातले. ईद आणि मोहरमला मुस्लिम महिलांना उज्ज्वला योजनेतून दोन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा अमित शहांनी केली. ईद, मोहरमला भाजपच्या सिलिंडरवर बिर्याणी शिजणार आहे.
आपल्या भाषणात अमित शहा यांनी जम्मू-कश्मिरातील जनतेवर आश्वासनांची बरसातच केली. महिलांना दरवर्षी 18000 रुपये, शेतकऱ्यांना 10000 रुपये तसेच वीज बिलात 50 टक्के सवलत, त्याचबरोबर 500 युनिट वीज मोफत देण्यात येणार असल्याचे आश्वासन अमित शहा यांनी दिले. गेल्या सत्तर वर्षांत जम्मू-कश्मीरवर फक्त अन्यायच झाला, अशी जुनी रेकॉर्डही शहा यांनी वाजवली. लहान मुलांना लॅपटॉप आणि टॅबलेटही मोफत देण्याची घोषणा शहांनी केली.