
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याला पाच दिवस उलटले आहेत. हल्ल्यानंतर शेकडो पर्यटकांनी कश्मीरमधून काढता पाय घेतला. तसेच ज्यांनी कश्मीर टूरचा प्लान केला होता, त्यांनीही आपली टूर रद्द केली. मात्र रविवारी पहलगामच्या रस्त्यांवर दिलासादायक दृश्य पहायला मिळाले. देशी-परदेशी नागरिक पहलगामच्या रस्त्यांवर फिरताना दिसले. यामुळे स्थानिक व्यावसायिकांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत.
क्रोएशियन आणि सर्बियन पर्यटक कश्मीरचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी दाखल झाले आहेत. हल्ल्याची कोणतीही भीती मनात न बाळगता हे पर्यटक निश्चिंत पहलगामच्या रस्त्यांवर फिरताना दिसले. यावेळी परदेशी पर्यटकांनी पहलगाममधील अतुलनीय सौंदर्याचे तसेच तेथील लोकांचेही कौतुक केले.
परदेशी नागरिकांचा 12 जणांचा ग्रुप कश्मीरमध्ये टुरिझमचा आनंद घेण्यासाठी आला आहे. यापैकी दोन दोन सर्बियाचे आणि इतर क्रोएशियाचे नागरिक आहेत. आपल्याला येथे खूप सुरक्षित वाट आहे, कश्मीर खूप सुंदर आहे, येथील लोकंही खूप दयाळू आहेत, अशी प्रतिक्रिया परदेशी पर्यटकांनी यावेळी दिली.
देशातील काही पर्यटकही येथे दाखल झाले आहेत. घाबरण्याचे काही कारण नाही. येथे संरक्षणासाठी सैन्य आहे, सरकार आमच्यासोबत आहे. तसेच स्थानिक लोक देखील आम्हाला पाठिंबा देत आहेत. येथे आल्यापासून कोणतीही भीती वाटली नाही, असे गुजरात येथून आलेल्या एका पर्यटकाने म्हटले आहे.