जम्मू-कश्मीरमधील पूंछ भागातील नियंत्रण रेषेजवळ बलनोई परिसरात मंगळवारी संध्याकाळी लष्कराचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जवान शहीद झाले. यामध्ये 11 मराठा रेजिमेंटमध्ये देशसेवा करणारे कामेरी (ता. जि. सातारा) गावचे सुपुत्र शुभम समाधान घाडगे (28) हे देशसेवा बजावत असताना शहीद झाले.
शुभम यांच्या मृत्यूच्या बातमीने कामेरी गावासह पंचक्रोशी व संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. संपूर्ण कामेरी गाव आपल्या सुपुत्राला आलेल्या वीरमरणामुळे सुन्न झाले आहे. शुभमच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. शुभमचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी येथे झाले. माध्यमिक शिक्षण शंकरराव आनंदराव घाडगे विद्यालय येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती शिवाजी कॉलेज अपशिंगे मि. येथे होऊन पुढे तो लष्करात भरती झाला होता.