
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराने विविध ऑपरेशन्स राबवले आहेत. लष्कराने कश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांची यादीच तयार केली आहे. आतापर्यंत सैन्याने 7 दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली असून दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्राल, अनंतनाग, पुलवामा, कुलगाम आणि शोपियान येथे शोध मोहिमेदरम्यान लष्कराने ही कारवाई केली आहे.
लष्कराच्या यादीनुसार, सध्या कश्मीरमध्ये एकूण 14 स्थानिक दहशतवादी सक्रिय असून त्यांची संपूर्ण माहिती लष्कराने मिळवली आहे. सोपोरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा एक स्थानिक दहशतवादीही सक्रिय आहे. अवंतीपोरामध्ये एक जैशचा दहशतवादी, तर पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैशचे प्रत्येकी दोन स्थानिक दहशतवादी सक्रिय आहेत.
सोफियानमध्ये एक हिजबुल आणि चार लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी सक्रिय आहेत. तर अनंतनागमध्ये दोन स्थानिक हिजबुल दहशतवादी, कुलगाममध्ये एक स्थानिक लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी सक्रिय आहे.
दरम्यान, हिंदुस्थानी लष्कराने शोपियानमधील दहशतवादी शाहिद अहमद कुटी, पुलवामामधील दहशतवादी हरिस अहमद, त्रालमधील दहशतवादी आसिफ शेख, अनंतनागमधील दहशतवादी आदिल ठोकर, कुलगाममधील दहशतवादी झाकीर अहमद गनई यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत.