Jammu and Kashmir- कठुआमध्ये आढळले तिघांचे मृतदेह; आणखी दोघे बेपत्ता

जम्मू-कश्मीरच्या ( Jammu and Kashmir ) कठुआ जिल्ह्यात दोन मुलगे बेपत्ता झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी सुरक्षा दलांना तीन स्थानिकांचे मृतदेह सापडले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मोहम्मद दिन आणि रहमान अली असे बेपत्ता झालेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे राजबाग परिसरात शेवटचे दिसले होते.

याप्रकरणी अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.

5 मार्च रोजी, लोहाई मल्हार येथे एका लग्नाला जाताना योगेश सिंग (32), दर्शन सिंग (40) आणि वरुण सिंग (15) हे तीन नागरिक बेपत्ता झाले होते. 8 मार्च रोजी इशु नाल्यात त्यांचे मृतदेह सापडल्याने या प्रदेशातील सुरक्षेच्या चिंता वाढल्या आहेत.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी माहिती दिली होती की, दहशतवाद्यांनी तीन नागरिकांची हत्या केली आहे आणि परिसरातील वातावरण बिघडवण्याचा कट सुरू असल्याचा दावा केला होता. या हत्यांमुळे जिल्ह्यात निदर्शने सुरू झाली आहेत.

‘कठुआ जिल्ह्यातील बानी भागात दहशतवाद्यांनी 3 तरुणांची केलेली निर्घृण हत्या अत्यंत दुःखद आणि चिंतेची बाब आहे. या शांत परिसरातील वातावरण बिघडवण्यामागे एक कट असल्याचे दिसून येते’, असे मंत्र्यांनी X वर म्हटले आहे.

‘आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली आहे. केंद्रीय गृहसचिव स्वतः जम्मूला पोहोचत आहेत जेणेकरून घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेता येईल. मला विश्वास आहे की अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि लोकांचा आत्मविश्वास मजबूत राहील याची खात्री केली जाईल’, असे ते म्हणाले.