
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या जम्मू आणि कश्मीर विधानसभेच्या एकदिवसीय विशेष अधिवेशनात सरकार आणि विरोधकांनी नापाक दहशतवादी इरादे एकजुटीने हाणून पाडू, असा ठराव एकमताने मंजूर केला. दहशतवादाविरोधातील लढ्यात केंद्र सरकारला साथ देणार. देश आणि जम्मू-कश्मीरचा सांप्रदायिक सलोखा तसेच प्रगतीच्या आड येणाऱ्या दहशतवाद्यांच्या हेतूंना पराभूत करणार, असा दृढनिश्चय ठरावाच्या माध्यमातून करण्यात आला.
उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी तीन पानांचा ठराव मांडला. त्यात केंद्र सरकारने सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर जाहीर केलेल्या राजनैतिक उपाययोजनांना पाठिंबा दर्शवण्यात आला. पहलगाम हल्ल्यासारखी दहशतवादी कृत्ये म्हणजे कश्मिरी जनतेच्या मनातील नीतिमत्ता आणि सलोख्याची भावना, संविधानात असलेल्या मूल्यांवर, जम्मू आणि कश्मीर तसेच देशाचे दीर्घकालीन वैशिष्ट्य राहिलेल्या एकता, शांती, बंधुभाव या भावनेवर थेट हल्ला आहे, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे.
अदील शाह यांच्या बलिदानाला अभिवादन
हे सभागृह शदीद सय्यद अदील हुसेन शाह यांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करते. पर्यटकांना वाचवण्यासाठी त्याने आपले प्राण गमावले. त्याचे धाडस आणि निस्वार्थता कश्मीरची खरी भावना अधोरेखित करते. त्याचे बलिदान भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणा ठरेल, असे ठरावात म्हटले आहे.
माझे राजकारण इतक्या खालच्या दर्जाचे नाही
केंद्र सरकारकडे कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करण्याची ही वेळ नाही. यासाठी निश्चितच आपण सातत्याने आवाज उठवला पाहिजे. पुढेही आवाज उठवू. परंतु याप्रसंगी मी ती मागणी करणार नाही. माझे राजकारण इतक्या खालच्या दर्जाचे नाही. 26 निष्पाप लोकांचा जीव गेलाय आणि आम्हाला विशेष राज्याचा दर्जा द्या, अशी मागणी मी आता केली तर मला माझीच लाज वाटली पाहिजे, असेही अब्दुल्ला म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची कबुली मी अपयशी ठरलो!
मुख्यमंत्री म्हणून पर्यटकांचे संरक्षण करण्यात मी अपयशी ठरलो. यजमान आणि मुख्यमंत्री तसेच पर्यटन मंत्री म्हणून पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी माझी होती. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची माफी कशी मागू, माझ्याकडे शब्द नाहीत, असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले. त्या पर्यटकांच्या मुलांना काय सांगू, त्या नौदल अधिकाऱ्याच्या विधवेला काय सांगू, ज्याचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. काही लोकांनी विचारले की, आमची चूक काय होती? आम्ही पहिल्यांदा कश्मीरमध्ये सुट्टी घालवण्यासाठी आलो होतो… या सुट्टीत जे झाले त्याचे परिणाम, दुःख आम्हाला आयुष्यभर भोगावे लागेल, या हल्ल्याने आतून पार खचून गेलोय, अशा शब्दांत ओमर अब्दुल्ला यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.