जामखेड पंचायत समितीमध्ये 126 पदे रिक्त; नागरिकांचा खोळंबा; पदे भरण्याची होतेय मागणी

जामखेड पंचायत समिती ही ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेमध्ये दुवा म्हणून काम करते. तालुक्यातील प्रशासन विभागात येणाऱ्या शिक्षण विभाग, आरोग्य, पशुवैद्यकीय, बांधकाम आणि गावचा गाडा हाकणाऱ्या ग्रामपंचायत विभागाचे प्रमुख कारभार तालुका पंचायत समित्यांमधून चालतो. मात्र, जामखेड पंचायत समिती प्रशासनातील रिक्त पदांमुळे तालुक्यातील प्रशासकीय विभाग दुबळा झाल्याचे वास्तव आहे. पंचायत समितीमध्ये विविध विभागांतील 126 पदे रिक्त आहेत. पंचायत समितीच्या 13 विभागांत जागा रिक्त आहेत. दरम्यान, एकीकडे मोठ्या प्रमाणात बेकारी, तर दुसरीकडे रिक्त जागा, अशी विषमता दिसत असून, लोकप्रतिनिधींनी ताबडतोब जागा भरण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, चालू वर्ष निवडणुकांचे वर्ष असणार आहे. लोकसभा त्यापाठोपाठ विधानसभा, नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे वर्ष जाणार आहे. त्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कार्यरत त्या-त्या विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण जाणवणार आहे. शिक्षण, आरोग्य व ग्रामपंचायत विभागात अपुरे कर्मचारी-तालुक्यातील शिक्षण विभागात 53 जागा अपुऱ्या आहेत. त्यापाठोपाठ आरोग्य विभागातील 9 आणि ग्रामपंचायतींमधील 15 जागा रिक्त आहेत. महत्त्वाच्या कृषी अधिकारी, पशुधन विकास अधिकारी विस्तार, बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका, जलसंधारण अधिकारी, उपअभियंता, गटशिक्षणाधिकारी या पदांवरील तसेच तालुका पंचायत समितीमधील महत्त्वाच्या 20 जागा रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांची हेळसांड होत आहे.
कर्मचाऱ्यांच्या खुर्चा बनल्या शोभेच्या बाहुल्या

87 गावांच्या व 58 ग्रामपंचायतींच्या प्रशासन व्यवस्थेचा बोजा वाहणाऱ्या तालुक्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागाला रिक्त पदांची वाळवी लागली आहे. त्यातच अतिरिक्त कामाचा ताण, वैयक्तिक कामे, आरोग्यविषयक तक्रारी यांचे कारण पुढे करून कार्यरत कर्मचाऱ्यांच्या रजेमुळेही प्रशासकीय विभागातील कार्यालये व कर्मचाऱ्यांच्या खुर्च्छा शोभेच्या बाहुल्या बनून उभ्या असतात. याचा नाहक त्रास नागरिकांना सेवा प्रदान करताना होत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच प्रशासकीय विभागातील रिक्त पदे भरली जावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत.

रिक्त जागा
पंचायत समिती विभाग कृषी अधिकारी 1, कनिष्ठ प्रशासन अधिकारी 1, वरिष्ठ सहायक लिपिक 1, कनिष्ठ सहायक 2,
ग्रामपंचायत अधिकारी 15.
आरोग्य विभाग : औषध निर्माण अधिकारी 1, कनिष्ठ सहायक 1, आरोग्य सहाय्यिका -2, आरोग्य सेवक 3, आरोग्य सेविका 2. पशुवैद्यकीय विभाग : पशुधन विकास अधिकारी विस्तार 1, पशुधन विकास अधिकारी खर्डा 1, सहायक पशुधन अधिकारी 1.
शिक्षण विभाग : गटशिक्षणाधिकारी 1, शालेय पोषण आहार अधीक्षक 1, विस्तार अधिकारी शिक्षण 2, वरिष्ठ सहायक लिपिक 2, केंद्रप्रमुख 5, मुख्याध्यापक 3, पदवीधर शिक्षक 5, प्राथमिक शिक्षक 24.

बांधकाम विभाग : जलसंधारण अधिकारी 2, स्थापत्य सहायक 1, अनुरेखक 1, वरिष्ठ सहायक लिपिक 1.
पाणीपुरवठा विभाग : उपअभियंता 1, शाखा आभियंता 4, वरिष्ठ सहायक 1.
एकात्मिक बाल विकास अधिकारी प्रकल्प: बालविकास विकास प्रकल्प अधिकारी 1, पर्यवेक्षिका 2, वरिष्ठ सहायक लेखा 1, कनिष्ठ सहायक लिपिक 1, अंगणवाडी सेविका 3, अंगणवाडी मदतनीस 32 अशा एकूण 126 जागा रिक्त आहेत.