ऐतिहासिक कोरेगाव-भीमा लढातईतील वीर जमादार खंडोजी माळवदकर यांच्या वंशजांना जयस्तंभाजवळील भूखंडातून हद्दपार केले जात आहे. याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आम्हाला येथील जागेतून हद्दपार करू नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
सुभेदार कॅप्टन बाळासाहेब आनंदराव माळवदकर, नामदेव गुलाबराव माळवदकर, अशोक गुलाबराव माळवदकर यांनी ऍड. सुधन्वा बेडेकर यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. पुणे जिल्हाधिकारी, बार्टी, भीमा-कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण आणि संवर्धन समिती यांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेवर 8 जानेवारी 2024 रोजी न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. माळवदकर यांच्याकडून वरिष्ठ वकील राम आपटे बाजू मांडत आहेत. दरम्यान, या भूखंडावर माळवदकर कुटुंबीयांनी बंगला व अन्य बांधकाम केल्याची नोंद ग्रामपंचायतीत आहे.
काय आहे प्रकरण
जयस्तंभाची देखभाल माळवदकर कुटुंब करत आहे व शेजारील एकूण 3 हेक्टर 86 एकर भूखंडावर शेती करीत आहे. गेली 196 वर्षे या भूखंडाचा ताबा या कुटुंबाकडे आहे. माळवदकर कुटुंबियांचा बंगला या जागेत आहे. माळवदकर यांचे पूर्वज जमादार खंडोजी गजोजी माळवदकर हे ब्रिटिश लष्करात हवालदार होते. 1 जानेवारी 1818मध्ये झालेल्या लढाईत ते होते. लढाईत ते जखमी झाले होते. या लढाईनंतर ब्रिटिशांनी त्यांच्यावर जयस्तंभाच्या देखभालीची जबाबदारी दिली.
वीर जमादार खंडोजी माळवदकर
कोरेगाव-भीमा लढाईनंतर ब्रिटिशांनी 13 डिसेंबर 1824 रोजी खंडोजी माळवदकर यांना या जयस्तंभाचे प्रभारी म्हणून नेमले. 7 डिसेंबर 1841 रोजी शेजारी गावांमध्ये अधिकची जमीन देऊन त्यांना सनद दिली. 1849 खंडोजी यांचे निधन झाले.
न्यायालयीन लढा
हवेली येथील उपविभागीय अधिकारी यांनी 23 सप्टेंबर 2016 रोजी माळवदकर कुटुंबियांना नोटीस पाठवली व या भूखंडावरील बांधकाम हटविण्यास सांगितले. याविरोधात त्यांनी पुणे दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. पुणे दिवाणी न्यायालयाने माळवदकर कुटुंबियांचा या भूखंडावर दावा नसल्याचा निकाल दिला. पुणे दिवाणी न्यायालयाचा हा निकाल रद्द करावा व या जागेतून माळवदकर कुटुंबियांना हद्दपार करू नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.