नेवासातील चांदा गावात अवतरली जलसमृद्धी; ‘नाम’, टाटा मोटर्स यांच्या विद्यमाने नऊ बंधारे, पाझर तलावांची कामे

>> नवनाथ कुसळकर

‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेअंतर्गत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून नाम फाउंडेशन व टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नेवासा तालुक्यातील चांदा या गावात नऊ साठवण बंधारे व पाझर तलावाची कामे झाल्याने चांदा गावात जलसमृद्धी अवतरली आहे. दरम्यान, यासाठी येथील ग्रामपंचायतच्या महिला सरपंच सुनंदा दहातोंडे यांचा पुढाकार आणि विशेष प्रयत्नाने नदीपात्र गाळमुक्त झाले.

नेवासा तालुक्यातील चांदा गावात जलसंधारण खात्याच्या माध्यमातून सीएसआर फंडातून कामे करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने सादर केला होता. यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी चांदा येथे नाम फाउंडेशन व टाटा मोटर्स या एनजीओतून काम करण्यास परवानगी दिली. शेतकऱयांचा सहभाग व ग्रामपंचायतचा पुढाकार यातून चांदात तब्बल नऊ साठवण बंधारे खोदण्यासाठी एक महिन्यापासून जेसीबी मशीनद्वारे काम सुरू आहे.

नदीची खोली व रुंदीकरणासाठी परिसरातील अनेक शेतकऱयांनी सहमती दर्शवली असल्याने या भागात नऊ बंधारे व पाझर तलावाची उभारणी करण्यात आली. वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेली नदी वेडय़ाबाभळी व काटेरी झुडपाने वेढली होती. नदीपात्रातील खोली व रुंदीकरण या कामामुळे साठवण बंधाऱयांत पाण्याची साठवण होणार असल्याने या भागातील हजारो हेक्टरची सिंचन क्षमता वाढणार आहे. शिवाय पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱयांची पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. शिवाय नदीपात्राचे स्वच्छता व नव्याने रस्ते उपलब्ध झाले. या कामामुळे नदीपात्राचे सुशोभीकरण व स्वच्छता झाली. शंकरवाडी शिवार, नवले वस्ती, चांद्यातील गावठाण परिसर भागांचे भाग्य उजळले आहे.

जलयुक्त शिवार तालुका समिती प्रांताधिकारी सुधीर पाटील, नेवासा जलसंधारण विभागाचे उपअभियंता प्रवीण दहातोंडे, मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी पाणी चळवळीसाठी मोलाचे योगदान दिले. महिला सरपंचाने सामाजिक व सेवाभावी संस्थांतूनच गावाचा कायापालट होऊ शकतो, ही संकल्पना राबवली गेली. चांदा गावची लोकसंख्या जवळपास 20 हजारहून अधिक आहे. मोठय़ा ग्रामपंचायतच्या महिला सरपंच असल्याने कारभार करताना तारेवरची कसरत असते. मात्र, सुनंदा दहातोंडे यांनी या सर्वांवर मात करत गावचा विकास डोळ्यासमोर ठेवून कामे सुरू आहेत.

‘‘बंधारे व पाझर तलाव खोदाईसाठी जास्त शेतकऱयांनी सहभाग नोंदवला आहे. नऊ बंधाऱयांलगतच्या शेतकऱयांना 15 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. गावच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून, विकासकामांत राजकारण नको, ही भूमिका कायम आहे. त्यामुळेच पाण्याबाबत झालेले काम झाले आहे.’’

– सुनंदा दहातोंडे, सरपंच चांदा.