जालन्यातील वाटूर फाटा येथील पोलीस चौकी समोरच एका तरुणाने पेटवून घेतल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून तरुणाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना शनिवारी (25 जानेवारी 2025) रात्री 9.55 च्या सुमारास घडली आहे. प्रल्हाद शेषराव भगस असे पेटवून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. सदर तरुणाचे गावातील एका व्यापार्याबाबत पैशांच्या देवाण-घेवाणीवरून वाद होता. या वादासंदर्भात प्रल्हादने पोलिसांसोबबत चर्चा केली. परंतु चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळेच बहुदा त्याने पोलीस चौकीतून बाहेर पळ काढला आणि स्वत:ला पेटवून घेतले. याच दरम्यान घटनेच्या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी तरुणाकडे धाव घेत त्याच्यावर पाणी टाकले आणि आग विझवली. या घटनेत तरुण 40 टक्के भाजला असून त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.