
जालना येथील गांधीनगर भागामध्ये वर्षानुवर्षे शेजारी राहत असलेल्या दोन कुटुंबांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर शाब्दिक बाचाबाचीमध्ये होऊन दोन गटांमध्ये राडा झाल्याची घटना 4 मार्च रोजी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान घडली. दोन गटातील या दगडफेकीमध्ये काही वाहनांचे नुकसान झाले. परिसरामध्ये असलेल्या एका मेडिकल दुकानाचीही तोडफोड झाली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांना शांत केले. पोलिसांनी दोन्ही गटातील नागरिकांना शांत केले असून, गांधीनगर परिसरामध्ये सध्या शांतता आहे. या दगडफेकीमध्ये एक जण किरकोळ जखमी असल्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.
दोन्ही गटांकडून पोलिसांमध्ये तक्रार देण्यात येत असून, त्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात येतील. हे प्रकरण हिंदू-मुस्लिम नसून, शेजारी राहणाऱ्या तरुणांमधील किरकोळ कारणावरील भांडण असून, शहरांमध्ये कोणीही अशा प्रकारची अफवा पसरवू नये आणि शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, असेही आवाहन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले. सध्या गांधीनगर भागात पोलिसांचा फौजफाटा तैनात असून, परिसरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यास पोलिसांना यश आलेले आहे.