
जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा येथील शेतकर्यांना महावितरणमुळे लाखोंचा फटका बसला आहे. शॉर्ट सर्किटमुळे बारा ते पंधरा शेतकर्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. शेतातील महावितरणच्या तारांंचा शॉटसर्किट झाल्याने आगीचे लोळ ऊसात पडले व त्यामुळे जवळपास तीस एकर ऊस जाळून खाक झाला आहे.
या दुर्घटनेत शेतकरी शरद संतोष भोपळे, पंढरीनाथ तुकाराम भोपळे, भगवान बापुराव भोपळे, आण्णा बापुराव भोपळे, अंबादास गिरजाजी भोपळे, लिंबाजी विठोबा भोपळे, विजय प्रल्हाद भोपळे, सचिन राजेंद्र भोपळे, विशाल अंकुश भोपळे, शिवाजी रामराव भोपळे, शिवाजी शेषराव भोपळे या शेतकर्यांचे ऊस जळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
खडकपूर्णा धरणाच्या बॅक वॉटरमूळे जाफराबाद तालुक्यातील परिसरात हनुमंतखेडासह आदी गावात दरवर्षीच उसाचे क्षेत्र खूप असते. मात्र साखर कारखान्याच्या अपुऱ्या नियोजनामुळे, ऊस टोळी कामगारांचे नियोजन कोलंमडल्यामुळे व या वर्षी कामगार कमी आल्यामुळे अनेक शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तालुक्यातील अनेक गावात अद्यापही शेकडो एकर ऊस आहे. परंतु आज झालेल्या घटनेमुळे ऊस उभा असलेल्या शेतकर्यांच्या पोटात धडकी भरत आहे. यामुळे आता सदरील शेतकर्यांचा ऊस कारखाना गाळपासाठी कधी नेणार? या शेतकर्यांना शासनाकडून मदत कधी मिळणार? याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जाफराबाद तालुक्याची मिनी बारामती म्हणून ओळख मात्र उस उत्पादक शेतकर्यांसाठी शाप ठरत आहे. खडकपूर्णा धरणाच्या बॅक वॉटरमुळे जाफराबाद तालुक्याला मिनी बारामती अशी ओळख निर्माण झाली असली तरी तालुक्यातील हक्काच्या रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उस उत्पादक शेतकर्यांकडे होणारे दुर्लक्ष, उस वाहतूक हाकेच्या अंतरावर असून देखील इतर कारखान्याच्या तुलनेत भावाचा असलेला फरक, यामुळे शतेकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे यावर्षी तर कारखान्याचे गाळपच बंद आहे. यामुळे शेतकर्यांची तारांबळ झाली आहे.