
एकीकडे मुली आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. तर, दुसरीकडे चौथीही मुलगीच झाली म्हणून जालना जिल्ह्यामध्ये आई-वडिलांनीच तीन महिन्यांच्या चिमुकलीचा विहिरीत ढकलून खून केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटना 12 एप्रिल रोजी घडली होती. त्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून चिमुकलीच्या आई-वडिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
जालन्यातील बदनापूर तालुक्यातील असरखेडा गावाच्या शिवारातील एका विहिरीत 12 एप्रिल रोजी एका तीन महिन्यांच्या चिमुकल्या मुलीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हलविली होती. अनैतिक संबंधातून मुलगी जन्मल्यामुळे खून झाला की अन्य काही कारणामुळे? अशा सर्व शक्यतांची पडताळणी करीत पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात मागील तीन महिन्यांत जन्मलेल्या सर्व मुलींचा आणि त्यांच्या माता-पित्यांचा डाटा जमविण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान, आरोपी सतीश पंडीत पवार आणि त्याची पत्नी पूजा सतीश पवार यांना चौथे अपत्यही मुलगी झाली. चौथीही मुलगीच झाली त्यामुळे कुटुंबातील काही जवळचे नातेवईक त्यांना वारंवार अपमानित करत होते. याच रागातून पवार दाम्पत्याने पोटच्या मुलीला संपवण्याचा डाव आखला. योग्य संधी साधत त्यांनी मुलीला फसवून दुचाकीवरून नेले आणि विहिरीत फेकून दिल्याचे पोलीस तपासात उघडं झाले आहे. पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात तपास पथकात कार्यरत असलेले पोलीस हवालदार जितेंद्र तागवाले यांनी असरखेडा परिसरातील गावे, तांडे, वाड्यांमध्ये जन्मलेल्या बालकांची माहिती काढत असताना, त्यांना या चिमुकलीच्या खुनाचे धागेदोरे हाती लागले.
मयत चिमुकलीच्या मातापित्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्यासह पोलीस हवालदार जितेंद्र तागवाले यांनी या गुन्ह्याच्या तपासात महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक एम. बी. स्कॉट, पोहेकाँ. मदन बहुरे, प्रशांत देशमुख, रवी देशमुख, कृष्णा तंगे, राजू पवार आदींनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.