मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्या – जरांगे

26 जानेवारीला सगेसोयरेची अधिसूचना काढून 1 वर्ष पूर्ण होतंय, परंतु याची अंमलबजावणी करायला एक वर्ष का लागले?. आमच्या हक्काचं आरक्षण ओबीसीतूनच द्यावे, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली. ते अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, तुम्ही मुलींना मोफत शिक्षण केले, कालच माझ्याकडे एक अर्ज आला. पुण्यातील वाघोलीतल्या कॉलेजनं एका मुलीला पत्र लिहून अद्याप मुलींना मोफत शिक्षणाची अंमलबजावणी झाली नाही असं कळवले. कोल्हापूरच्या भाजप जिल्हाध्यक्षानेही पत्र देऊन मुलीचा प्रवेश रद्द करू, नये अशी कॉलेजकडे मागणी केली आहे. हा इतका बोगस प्रकार आहे. आम्ही 10 टक्के आरक्षण मागितले नाही, ओबीसीतलं आरक्षण मागितले. कुणबी नोंदी शोधायचं काम बंद झाले, मराठ्यांचा छळ सरकार का करतंय, आमच्या हक्काचं आरक्षण दिले जात नाही, असा निशाणा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर साधला.

बीडच्या संतोष देशमुख हत्येप्रकरणी एकही आरोपी सुटणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय म्हणून मराठे शांत बसले आहेत. आमच्याशी दगाफटका व्हायला लागलाय आणि सरकारमधील एक मंत्री सांभाळण्यासाठी खून पचवायचा आहे आणि आरोपी सुटले तर आम्ही रस्त्यावर येऊ. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनीही कुठलीही काटकसर करायची नाही. देशमुख कुटुंबीय देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर गेले. त्या कुटुंबावर अन्याय होणार नाही असं वाटतं. या धनंजय मुंडेंच्या टोळ्या आहेत त्यांना सांभाळण्याची गरज काय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.