Jalna News – चारही पाय तोडलेला नर बिबट्या मृतावस्थेत आढळला, परिसरात खळबळ

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंबड-भालगाव रोडवर एका पुलाखाली चारही पाय तोडलेल्या एका नर बिबटयाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबड-भालगाव रोडवर शंकर राजाराम भोजने यांच्या गट नं. 121 च्या शेताजवळ मंगळवारी (25 फेब्रुवारी 2025) सकाळी 11 वाजता पुलाखाली एक बिबट्या सडलेल्या अवस्थेत गुराख्याला दिसून आला. त्यांनी तत्काळ सदर बाब वन विभागाच्या कर्मचार्‍यास कळवली. त्यावरून वन परीक्षेत्र अधिकारी विजयकुमार दौंड यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी सदर घटनेचा पंचनामा तसेच पोस्टमॉर्टम करून बिबट्यावर अंत्यसंस्कार केले. बिबटया मारल्याची माहिती शहर व परिसरात पोहचल्याने लोकांनी बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली होती.

सदर बिबट्या बाबत वन परीक्षेत्र अधिकारी विजयकुमार दौंड यांच्याशी विचारणा केली असता, त्यांनी हा अडीच-तीन वर्ष वयाचा नर बिबट्या आहे. तसेच त्याची बॉडी सडली असल्यामुळे त्याला नुकतेच काही दिवसांपूर्वी मारलेले असावे. तसेच तो कोणीतरी मारून या ठिकाणी आणून टाकला असावा, असा अंदाज व्यक्त केला. तसेच या बिबट्याचे चार पंजे कापलेले आहे. या बाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.