
घराबाहेर झोपलेल्या एका शेतकऱ्याचे तोंड दाबून अपहरण करून जीवे न मारता सोडून देण्यासाठी 25 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच दरोडेखोरांना मौजपुरी पोलिसांनी रविवारी 30 मार्च रोजी जेरबंद केले आहे. मौजपुरी (ता.जालना) हद्दीतील धानोरा येथे ही घटना घडली होती. संशयित आरोपी हे पोलीस रेकार्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धानोरा येथील शेतकरी निवृत्ती तांडगे हे 22 मार्च रोजी रात्री रोजी घराबाहेर झोपलेले होते. यावेळी स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या पाच ते सात जणांनी रात्री दीड वाजेच्या सुमारास निवृत्ती तांगडे यांचे तोंडून दाबून अपहरण केले. वाहनातून त्यांना जालन्याच्या दिशेने घेऊन गेले. खिशातील पंधरा हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर जीवे न मारता सोडून देण्यासाठी २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. भितीपोटी तांगडे यांनी पैसे देण्याचे कबुल केले. त्यानंतर आरोपींनी तांडगे यांना पहाटेच्या सुमारास घोडेगाव फाटा येथे आणून सोडले. त्यानंतर दुपारी चार वाजता मोबाईलवरून संपर्क करून 25 लाखांची खंडणी मागितली. अन्यथा कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तांगडे यांनी मौजपुरी पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक निरीक्षक मिथुन घुगे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला.
डुकरी-पिपरी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित आरोपींची स्कॉर्पिओ गाडी 22 रोजी रात्री पास झाल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे संशयित गणेश तात्याराम श्रीखंडे, रामप्रसाद उर्फ बाळू डिगांबर शिंदे (दोघे रा.सावरगाव हडप), आकाश अशोक घुले (रा.मुकिंदापूर,जि.अहिल्यानगर), विशाल उर्फ गजानन डोंगरे (रा.सावरगाव हडप, जालना), आकाश तुकाराम रंधवे (रा.हडप) यांनी सदर गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना रविवारी अटक केली. अधिक चौकशी केली असता, संशयितांनी अनिकेत गोरख उकांडे (रा.अकोलेनगर,जि.अहिल्यानगर) व शाम चव्हाण (रा.सरस्वती मंदिर परिसर) यांच्या मदतीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. दरम्यान, पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन व मोबाईल, असा एकूण 9 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच फरार अनिकेत व शाम यांचा शोध घेण्यात येत आहे. संशियतांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिली.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजपुरी ठाण्याचे सहायक निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक विजय तडवी, जाधव, चंद्रकांत पवार, ज्ञानोबा बिरादार, मच्छिंद्र वाघ, दिलीप गोडबोले, नितीन खरात, राजेंद्र देशमुख, भास्कर वाघ, सतीश गोफणे, नितीन कोकणे, प्रदीप पाचरणे, अविनाश मांटे, धोंडिराम वाघमारे, प्रशांत म्हस्के, सदाशिव खैरे, कैलास शिवणकर, सागर बाविस्कर यांनी ही कारवाई केली.