
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात एक दुर्दैवी घटना घडली आहे. या भागात सुरू असलेल्या पुलाचा बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर मध्यरात्रीच्या सुमारास वाळूचा टिप्पर खाली करण्यात आला. यामुळे वाळू खाली दबून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटे साडे तीनच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, पासोडी शिवारामध्ये पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या बांधकामाच्या जवळच कामासाठी आलेल्या मजुरांची पत्र्याचे शेड उभारले आहेत. याच शेडमध्ये धनवई कुटुंब झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चालकाने निष्काळजीपणाने वाळूचा टिप्पर शेडवर रिता केला. त्यामुळे शेडमध्ये झोपलेले सहा जण वाळू खाली दबले गेले. शेड बाहेर झोपलेल्या महिलेच्या हा प्रकार लक्षात येताच तिने आरडाओरडा केला.
महिलेने आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना बोलावून आणले. त्यांनी वाळूचा ढिगारा हटवत सहा जणांना बाहेर काढले. यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला होता, तर एक 12 वर्षांच्या मुलीला वाचवण्यात यश आले आहे.
गणेश काशिनाथ धनवई (वय – 50, रा. गोळेगाव, ता. सिल्लोड), भूषण गणेश धनवई (वय – 17, रा. गोळेगाव, ता. सिल्लोड), राजेंद्र दगडूबा वाघ (वय – 40, रा. दहिद, ता. बुलढाणा), सुनील समाधान सपकाळ (वय – 20, रा. पद्मावती, ता. भोकरदन जि. जालना), सुपडू आहेर, (वय – 38, रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव) अशी मृतकांची नावे आहेत. मृतक सर्वजण एकमेकांचे सख्खे नातेवाईक आहेत.
पासोडी शिवारामध्ये पुलाचे काम सुरू असून रवींद्र आनंद हा ठेकेदार आहे. या ठिकाणी कामासाठी स्वस्त वाळू उपलब्ध व्हावी म्हणून ठेकेदार रात्रीच्या सुमारास अवैध वाळू आणून टाकत होता. ठेकेदार आणि चालकाच्या निष्काळजीपणामुळे पाच जणांचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. तसेच महसूल विभागालाही पाचारण करण्यात आले आहे.