
जालन्यातील राजूरा परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. पंढरपूरहून सावळ्या विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा गावी निघालेल्या भक्तांना घेऊन जाणारी काळी पिवळी जीप विहिरीत कोसळली. या दुर्दैवी अपघातात सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर काळी पिवळीमध्ये 13 भाविक प्रवास करत होते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
जालना जिल्ह्यातील राजूर परिसरातील काही भक्त आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला वारीसाठी गेले होते. विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर आज (18 जुलै) सर्व भक्त आपल्या गावी जाण्यासाठी जालना बसस्थानकावर आले होते. त्यानंतर बसस्थानकावरून काळी पिवळी जीपने प्रवास करत 13 भावीक चनेगाव या मुळ गावी निघाले. जालना वरून भक्तांनी भरलेली जीप राजूरच्या दिशेने जात असताना खडेश्वर बाबा मंदिर ते वसंत नगर (राजूर जवळील) येथे जीप आणि दुचाकीचा गंभीर अपघात झाला. या अपघातात जीप रस्त्याशेजारी असणाऱ्या विहिरीमध्ये कोसळली. अचानक झालेल्या या अपघातात दुर्दैवाने 6 भाविकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत विहिरीतून सहा भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आहेत. तर तीन जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची भिषणता पाहता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.