
नाव बदलून बांगलादेशातील दाम्पत्य घुसखोरी करून हिंदुस्थानात आले. परंतु त्यांच्यात भांडण होत असल्याने पतीने 112 वर कॉल करून तक्रार केली. यानंतर पोलिसांनी येऊन चौकशी केली असता, दोघेही बांगलादेशी असल्याचे उघड झालं. ही घटना जालना-छत्रपती संभाजीनगर रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये उघडकीस आली आहे. बुलबुली मुस्ताफजूर रहमान नाव असलेल्या बांगलादेशी महिलेन रिया मंडल (23) असे बनावट नाव धारण केले. ही महिला नवी मुंबईतील सानपाडा परिसरात पती असलममनी काझी याच्यासोबत राहत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील एकासोबत बुलबुलीचे ऑनलाइन प्रेम जुळले होते. बांगलादेशात गरिबीला कंटाळून पती-पत्नीने हिंदुस्थानात प्रवेश केला होता. यानंतर हे दाम्पत्य मुंबईतील सानपाडा परिसरात राहत होते. भांडण होत असल्याने महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी जालना गाठले. नंतर पतीही तिच्या मागावर असल्याने त्यांच्यात वाद झाला. यामुळे पती असलम काझी याने त्याच्या फोनवरून 112 या क्रमांक डायल केला. नंतर पोलिसांनी दोघांचीही चौकशी केली असता, ते बांगलादेशी असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही बांगलादेशींच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु केली आहे. दोन्ही कोणाच्या संपर्कात होते, कोणाच्या माध्यमातून त्यांनी हिंदुस्थानात घुसखोरी केली, त्यांच्याप्रमाणे आणखी किती बांगलादेशी घुसखोर आले आहेत, या बाबींची पोलीस माहिती घेत आहेत. त्याचबरोबर मुंबईत पोलिसांचे पथकही तपासासाठी जाणार आहे.
दरम्यान तीन महिन्यांपूर्वी बदनापूर पोलिसांनी यापूर्वीही एका महिलेला ताब्यात घेतले आहे. ती महिलाही इतर दोन जणांसोबत बांगलादेशातून भारतात आली होती. ती लग्नही करणार होती. त्यापूर्वीच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. ही महिला सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.