
जालन्यातील सदर बाजार पोलिसांनी जबरदस्त दोन कारवाया करत एका सराईत गुन्हेगाराकडून जिवंत काडतुसासह गावठी कट्टा तर दुसऱ्या गुन्हेगाराकडून धारदार खंजीर जप्त केला.
जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्याचे डीबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के यांना गोपनीय माहिती मिळाली की पुट्टी ऊर्फ पृथ्वीराज बबन घाटेकर (20, रा. गुरुगोविंदसिंगनगर, जालना) हा त्यांच्या विनाक्रमांकाच्या मोटारसायकलवर कमरेला गावठी कट्टा (अग्नी शस्त्र) लावून काही तरी गंभीर गुन्हा करण्याच्या व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने जालन्यातील जिजामाता प्रवेशद्वारापासून एसआरपीएफजवळ पाण्याच्या टाकीकडे गेला आहे अशी खात्रीलायक माहिती मिळताच त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना देऊन त्यांच्या आदेशाने तसेच मार्गदर्शनाखाली दोन पंच व नमूद पोलीस स्टाफसह जिजामाता प्रवेशद्वारपासून आत जाऊन एसआरपीएफ पाण्याच्या टाकीसमोरील वनीकरणाचे सहान जागेमध्ये आरोपीचा शोध घेऊन त्यास पंचासमक्ष ताब्यात घेतले.
त्याच्या ताब्यातून सदर बाजार पोलीस ठाणे डीबी पथकाने एक राखाडी रंगाचा लोखंडी धातुचा देशी बनावटीचा गावठी कट्टा तसेच एक मॅगझिन व पिवळ्या रंगाचा व समोरील बाजूस तांब्याची गोलाई असलेला व पाठीमागील बाजूस केपी 7.65 असे लिहिलेले एक जिवंत काडतूस तसेच एक काळ्या रंगाची विनाक्रमांकाची हीरो कंपनी स्प्लेंडर प्लस मोटारसायकल असा एकूण 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच सदर बाजार पोलीस ठाण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार जयेश किशोरसिंग राजपूत (रा. बालाजी गल्ली, बालाजीनगर, जालना) हा दर्गावेस कमानीजवळ त्याचे कमरेला एक धारदार खंजीर लावून फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्यास दोन पंचासमक्ष ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक धारदार खंजीर डीबी पथकाने जप्त केली. असा एकूण 1 लाख 50 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयूष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डी. बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के, पोहेकॉ. रामप्रसाद रंगे, पोहेकॉ. जगन्नाथ जाधव, पोहेकॉ. कावळे, पोना. पटेल, पोकॉ. दुर्गेश गोफणे, पोकॉ. गणेश तेजनकर, पोकॉ. धनंजय लोंढे, पोकॉ. शेख व चालक कल्पेश पाटील यांनी केली.