Jalna crime news : शेतजमिनीच्या वादातून निर्घृण खून, तीन जखमी; पोलिसांकडून 7 जणांना अटक

जालना तालुक्यातील नेर येथे शेतजमिनीच्या वादातून शुक्रवारी दुपारी भावकीच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत काठ्या, कुऱ्हाडी, कोयत्याचा सर्रास वापर करण्यात आला. यावेळी झालेल्या मारहाणीत संतोश किसनराव उफाड (वय – 38) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रात्रीच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. तर संतोष यांचा मुलगा सोमेश उफाड आणि पुतण्या शशांक उफाड, तसेच कैलास उफाड यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, याप्रकरणी मौजपुरी पोलीस स्थानकात कैलास उफाड, अरुण उफाड, श्याम उफाड, अमोल उफाड, आदित्य उफाड, केशव उफाड आणि नर्मदा उफाड यांच्याविरुद्ध भादंवि कलम 302, 307, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्यासह सहकाऱ्यांनी रात्रीच आरोपींचा शोध घेत सर्वच्या सर्व 7 जणांना अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.