जळगावमध्ये भीषण रेल्वे अपघातात 12 ठार, पुष्पक एक्प्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेने हाहाकार

लखनौ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी रेल्वे रुळावर उडय़ा मारल्या. त्याचवेळी विरुद्ध दिशेने बंगळुरूहून येणाऱया भरधाव कर्नाटक एक्स्प्रेसने 12 प्रवाशांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना आज जळगावमध्ये घडली. दुर्घटनेची तीव्रता इतकी भीषण होती की, संपूर्ण रेल्वे ट्रकवर ट्रेनच्या खाली चिरडलेले मृतदेह, रक्तमांसाचा सडाच पडला. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले असून चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे तर रेल्वे बोर्डाने मृतांच्या नातेवाईकांना दीड लाख, गंभीर जखमींना 50 हजार तर जखमींना उपचारासाठी पाच हजार रुपये मदत जाहीर केली आहे.

लखनौहून मुंबईकडे येणाऱया पुष्पक एक्स्प्रेसने जळगाव सोडल्यानंतर माहेजी ते पारधाडेदरम्यान अचानक ट्रेनमध्ये कुणीतरी आग लागली… आग लागली… असे ओरडले आणि साखळी खेचली. त्यामुळे प्रवाशांची धावपळ उडाली. त्याचवेळी अनेक प्रवाशांनी ट्रकवर उडय़ा मारल्या आणि तिथेच घात झाला. दुर्घटनेत 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची आणि 4 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, कुणीतरी साखळी खेचली. मोटरमनने ब्रेक दाबल्यामुळे चाकातून ठिणग्या उडाल्या, त्यानंतर आगीची अफवा पसरल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु असे काही घडले नसल्याचे रेल्वे बोर्डाचे दिलीपकुमार यांनी सांगितले. या घटनेची चौकशी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा करणार आहेत.

रेल्वे अपघात दुर्दैवी

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पुष्पक एक्स्प्रेसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली आहे. जळगाव येथे घडलेली अपघाताची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. एक्स्प्रेसला आग लागल्याचा समज झाल्याने प्रवाशांनी घाबरून एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या आणि हा दुर्दैवी अपघात घडला. अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशी पोस्ट आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरून केली आहे. जखमी प्रवाशांना लवकरात लवकर योग्य उपचार मिळून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.