Jalgaon News – अल्पवयीन मुलीला बळजबरीने ओढत शेतात नेले, आधी बलात्कार मग दगडाने ठेचून हत्या

राज्यातील मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेत नाहीत. जळगावमध्ये संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बहिणींसोबत शेतातून घरी चाललेल्या मुलीला नराधमाने बळजबरीने ओढत शेतात नेत तिच्या बलात्कार केला. त्यानंतर मुलीची दगडाने ठेचून हत्या केली. चोपडा तालुक्यातील विरवाडा येथे ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुकेश पुन्या बारेला असे आरोपीचे नाव आहे.

शेतमजुराच्या चार अल्पवयीन मुली शनिवारी सायंकाळी शेतातील काम आटोपून घरी जात होत्या. याचदरम्यान आरोपीने त्यांना वाटेत गाठले. चौघींपैकी 12 वर्षाच्या मुलीला आरोपीने बळजबरीने ओढत शेतात नेले. इतर तीन मुलींनी घराकडे धाव घेत सदर घटना सांगितली. यानंतर गावातील लोकांचा जमाव शेताकडे धावला. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. नराधमाने तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली होती. शेतात विवस्त्र अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक, चोपडा विभागाचे पोलीस अधिकारी, एलसीबी पथक, डॉग स्कॉड, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वेगात तपासाची चक्रे फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.