जळगावात रविवारी सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. प्रेमविवाहाच्या वादातून शहरातील पिंप्राळय़ात तरुणाचा खून झाल्याची घटना घडल्याचे पडसाद उमटले असून संशयितांच्या घरांची जाळपोळ करण्याचा प्रयत्न सोमवारी करण्यात आला आहे. शहरातील पिंप्राळा हुडको येथे तरुणाच्या खून प्रकरणामध्ये संशयित आरोपींचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला आहे. दरम्यान, मयत तरुणाच्या नातेवाईकांनी आक्रोश करत हल्लेखोरांना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली.
पिंप्राळा हुडको परिसरात प्रेमविवाह केल्याच्या जुन्या वादातून मुकेश रमेश शिरसाट (28) या तरुणाचा कोयता, चाकूने वार करून गंभीर जखमी करत निर्घृण खून करण्यात आला होता. मयत तरुणाच्या घरातील 6 ते 7 जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. रामानंदनगर पोलीस ठाण्यात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी 7 संशयित आरोपींना अटक केली आहे. मयताच्या नातेवाईकांनी मारहाण करणारे आणि हल्लेखोर यांचे बंद घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करू असा इशारा मयत मुकेश शिरसाट याची पत्नी, आई आणि बहीण यांनी दिला आहे.
मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
मुकेश शिरसाट याचे हत्येप्रकरणी मुकेशचा नातेवाईक सोनू रमेश शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतीश जुलाल केदार, प्रकाश शंकर सोनवणे, सुरेश भुताजी बनसोडे, बबलू सुरेश बनसोडे, राहुल शांताराम सोनवणे, पंकज शांताराम सोनवणे, अश्विन सुरवाडे, विकी राजू गांगले, बबल्या राजू गांगले यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. पिंप्राळा हुडको जळगाव) यांच्या विरोधात विविध कलमान्वये रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खून प्रकरणात पोलिसांनी 10 जणांनापैकी 7 जणांना ताब्यात घेतले आहे तर उर्वरित फरार झालेल्या संशयीतांचा शोध घेणे सुरू आहे.