जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील सुभाष सखाराम पालोदे हे आपल्या कुटुंबासह गावापासुन दोन किलोमीटर अंतरावर शेतात राहत होते. मात्र शनिवारी रात्री घराजवळील गोठ्यात बाप व लेकामध्ये वाद झाल्याने मुलगा विलास सुभाष पालोदे (40) याने वडील सुभाष सखाराम पालोदे (५५) यांच्या डोक्यात कुर्हाडीने सपासप वार करुन ठार केले. ही घटना रविवारी 7 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी घटनेच्या ठिकाणी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. तसेच सदर घटनेची माहिती पारध पोलिसांना कळताच पारध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चैनसिंग घुसिंगे, प्रदिप टेकाळे, ओम नागरे हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच संबधीत घटनेची माहिती मयताची पत्नी लक्ष्मीबाई सुभाष पालोदे यांनी पोलिसांना दिली. मुलगा विलास पालोदे हा सुभाष पालोदे यांना शेतजमीन नावावर करुन द्या, मला ती विकायची आहे. म्हणुन सतत मारहाण करायचा व त्रास द्यायचा यावरुन रात्री शनिवारी त्याने वडिलांना कुर्हाडीने मारहाण करुन जिवे मारले, असे लक्ष्मीबाई यांनी पोलीस फिर्यादीत सांगितले आङे. आरोपी विलास पालोदे याला ताब्यात घेण्यात आले असुन त्याच्यावर पारध पोलीस ठाण्यात कलम 103 नुसार गुन्हा नोंद झाला आहे.