जालना जिल्ह्यातील पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आन्वा परिसरातून तीन बांगलादेशी नागरिकांना 27 डिसेंबर रोजी ATS पथकाने अटक केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहीतीनंतर पारध पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई केली. हे बांगलादेशी नागरिक हे बेकायदेशीररित्या कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्राशिवाय व मुलकी अधिकारी यांची परवानगी न घेता घुसखोरीच्या मार्गाने हिंदुस्थानात आले होते. ते जालन्यातली आन्वा परिसरात खडी क्रशर मशीनवर काम करत होते.
इमदाद हुसेन पिता मोहम्मद उली हमद उर्फ सिपॉन (26), हुमायुन कबीर मोहम्मद उली अहमद(40) व मानिक जैनुल्लाब्दीन खान(42) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींकडे विवो व ओप्पो कंपनीचे मोबाईल व जिओ व एअरटेल कंपनीचे सिमकार्ड सापडले आहेत. तसेच दोन बनावट आधारकार्ड देखील सापडले असून त्यावर कल्याण व ठाणे येथील पत्ता आहे. याप्रकरणी पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने करत आहे.