दखल- माध्यमसम्राट

>> जयप्रकाश झेंडे

सुभाषचंद्र गोयल हे सुभाषचंद्रा या नावानेही ओळखले जातात. ‘एस्सेल ग्रुप’ या उद्योगसमूहाचे ते संस्थापक. दालचावल ते टीव्ही चॅनल असा असलेला त्यांचा रोमहर्षक प्रवास साऱयांसाठीच प्रेरणादायी आहे. 1992 मध्ये त्यांनी ‘झी टीव्ही’ ही भारतातील पहिली उपग्रह वाहिनी सुरू केली. त्यांच्यासारख्या धडाडीच्या उद्योजकांच्या प्रयत्नांमुळेच आजचे युग हे मीडियाचे म्हणजेच प्रसारमाध्यमांचे युग म्हणून ओळखले जाते. गेल्या तीसेक वर्षांत विविध प्रसारवाहिन्यांचे जे एक जाळे निर्माण झाले आहे त्याचे श्रेय निःशंकपणे ‘झी’ या देशातील पहिल्या खासगी वाहिनीस आणि पर्यायाने सुभाषचंद्र गोयल यांनाच द्यावे लागेल. आज झी वाहिनी स्कॉटलंड, इंग्लंड, मॉरिशस, श्रीलंका, अमेरिका, दुबई, सिंगापूर, थायलंड, कोरिया अशा जगभरातल्या अनेक देशांतून पाहिली जाते.

सध्याच्या युगात आपण सारेच जण सर्वसाधारपणे विलक्षण धावपळीचे, ताणतणावाचे आणि आव्हानांनी भरलेले जीवन जगत असतो. अर्थातच कर्तृत्ववान व्यक्तींच्या आयुष्यात या सर्वांचे प्रमाण फारच अधिक असते. प्रत्येकजण यातून मार्ग काढण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करीत असतो. सुभाषचंद्रांनीही यासाठी भारतातील सर्वांत जुन्या आणि पारंपारिक ‘विपश्यना’ या सकारात्मक ध्यानपद्धतीचा परिणामकारक अवलंब केला आणि मुख्य म्हणजे तेवढय़ावरच न थांबता सर्वसामान्यांसाठीही हा मार्ग उपलब्ध व्हावा यासाठी ते कार्यरत राहिले हे विशेष! या पुस्तकातील महत्त्वाच्या काही प्रकरणापैकी एक म्हणजे ‘उद्योजकीय गुणवैशिष्टय़े’ हे प्रकरण. या प्रकरणात प्रस्तुत संपूर्ण पुस्तकाचे जणू सारच आहे आणि त्यात लेखक सुधीर सेवेकर यांच्या अनुभवाचा कस लागल्याचे स्पष्टपणे प्रतीत होते.

अशा पुस्तकांमधून आपल्याला आयुष्यात असे धडे शिकायला मिळतात, की जे अन्यथा आपण शिकलो नसतो. आपले भवितव्य घडवताना अशा महान व्यक्तीचे परिपक्व दृष्टिकोन आपल्या जीवनाच्या वाटा सुकर करतात. आपल्याला आपल्याहून जास्त अनुभव असलेला मार्गदर्शक मिळतो. त्याचबरोबर आपल्याला एक निश्चित दिशा मिळते. एक छोटय़ा गावातील दालचावल विकणाऱया तरुणाने या आधुनिक काळातील ‘माध्यमसम्राट’ होण्यापर्यंत जी झेप घेतली आहे, ती स्तिमित करणारी आहे.

माध्यमसम्राट सुभाषचंद्र गोयल लेखक- सुधीर सेवेकर
प्रकाशन- साकेत प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर
पृ .संख्या- 216 किंमत- 250 रुपये