मध्य प्रदेशात जैन मंदिरात तोडफोड; दोन दिवसांपासून तणाव, राहत इंदौरी यांचा शेर लिहित एक्सवरून आरोप

मध्य प्रदेशातील सागर येथील एका मंदिरात तोडफोडीची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली असून दोन दिवसांपासून परिसरात तणाव वाढला आहे.  एक्सवरील एका पोस्टमध्ये राहत इंदौरी यांचा शेर लिहीत मुस्लिम, ख्रिश्चनानंतर आता जैन समाजाला लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडियावर तोडफोडीच्या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले असून यात ‘जय श्रीराम’चे नारे देत तोंडावर मास्क घातलेले तरुण तोडफोड करताना दिसत आहेत.

राहत इंदौरी यांचा लगेगी आग तो आएंगे घर कई जद में, यहां पे सिर्फ हमारा मकान थोडी है हा शेर पोस्टमध्ये लिहिण्यात आला आहे. अल्पसंख्याकांमध्ये मुस्लिम, ख्रिश्चनांनंतर आता जैन समाजाला लक्ष्य करण्यात येत आहे, असा आरोप या पोस्टमध्ये एका युजरने केला आहे. या घटनेनंतर सराफा बाजार बंद ठेवण्यात आला असून हिंदू आणि जैन समाजाचे लोक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचे समोर आले आहे. तोडफोड करणारे तरुण जैन समाजातील असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे. काही तरुण मास्क घालून आले होते आणि त्यांनी तोडफोड केली. तसेच काही लोकांना मारहाण केल्याचा आरोप हिंदू संघटनांकडून करण्यात आला आहे.

परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप

पोलिसांनी संपूर्ण परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शनिवारी हल्ल्याची घटना घडल्यानंतर रविवारी दुपारी कोतवाली परिसरात तरुणांनी घोषणाबाजी करत मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी लाठीचार्ज करत त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, कोतवाली पोलीस ठाण्याचे इन्चार्ज नवीन जैन यांच्यावर कारवाई करण्यात पक्षपात केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर  आमदार शैलेंद्र जैन यांनी एक व्हिडीओ जारी करत हिंदू आणि जैन समाजाने शांतता आणि सौहार्द कायम राखण्याचे आवाहन केले आहे.