बलात्कार प्रकरणी जैन मुनीला 10 वर्षांचा कारावास

दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराज याला बलात्कार प्रकरणी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. 19 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सुरत सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. वैद्यकीय तपासणी आणि फॉरेन्सिक अहवालासह सर्व कागदोपत्री पुरावे सादर करून आरोप सिद्ध करण्यात आले.

2017 मध्ये दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराज यानी एका 19 वर्षांच्या महिला जैन भक्तावर बलात्कार केल्याचा आरोप होता. शुक्रवारी त्यांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. आज त्यांची शिक्षा जाहीर करण्यात आली. जैन मुनी सुरतमधील नानपूर येथील उपाश्रयात राहत होते.

मूळ मध्य प्रदेशातील 19 वर्षांची मुलगी आणि तिचे कुटुंब यांची त्यांच्यावर श्रद्धा होती. ते त्यांना गुरू मानत होते. शांतीसागर याने त्यांना पूजाविधीच्या बहाण्याने सुरत आश्रमात बोलावले होते. रात्री कुटुंब आश्रयस्थानात राहिले. रात्री साडेनऊच्या सुमारास शांतीसागर यांनी मुलीला पूजेचे निमित्त करून त्यांच्या खोलीत बोलावले. यावेळी पूजेच्या बहाण्याने त्यांनी मुलीवर बलात्कार केला होता.

सुरुवातीला कुटुंबाने समाजात मानहानी होईल म्हणून शांतीसागर याच्याविरोधात तक्रार दिली नाही; परंतु इतर कुठल्याही मुलीसोबत असे घडू नये असे वाटल्याने सुरतमधील अथवलाइन्स पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शांतीसागरला अटक केली.