सध्या राजकारणात कधी काय घडणार याचं काही सांगता येत नाही, काही अंदाज बांधता येत नाही अशी परिस्थिती पाहायला मिळते. अशातच सध्या कर्नाटकातील राजकारणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या खुर्चीला धोका असल्याचं बोललं जात असून उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी पदभार स्वीकारावा अशी मागणी वाढली आहे. एका जैन भिक्षुंनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी डीके शिवकुमार यांना जाहीरपणे पाठिंबा दिला आहे.
सोमवारी हुबळी येथे झालेल्या एका कार्यक्रमात गुणधर नंदी महाराज यांनी शिवकुमार यांच्याबद्दल पडलेल्या स्वप्नाबद्दल सांगितलं.
आपल्याला दोन स्वप्ने पडली असं सांगतानाच ते म्हणाले, ‘एक म्हणजे जैन विकास महामंडळ मंडळ असावे आणि दुसरे म्हणजे तुम्ही (डीके शिवकुमार) मुख्यमंत्री व्हावे’.
भिक्षूंच्या या दाव्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, ‘एखादे भिक्षूच असे आशीर्वाद देत असतील तेव्हा मी काय बोलू शकतो? ते काय म्हणतात यावर मी नियंत्रण ठेवू शकत नाही आणि ती त्यांची इच्छा आहे. पण माझा पक्ष सर्वकाही ठरवेल. आम्ही पक्षाप्रमाणे काम करू; पक्ष महत्त्वाचा आहे. मला कोणत्याही पदाच्या शोधात जाण्याची गरज नाही. मी माझे कर्तव्य करत आहे आणि मला कशाचीही गरज नाही’.
मंगळवार, 21 जानेवारी रोजी बेळगावी येथे झालेल्या गांधी भारत कार्यक्रम आणि काँग्रेस अधिवेशनात शिवकुमार यांच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन केले. त्यावेळी भिक्षूने केलेल्या समर्थनाची आठवण झाली. कोप्पल, होसापेटे, बल्लारी आणि चित्रदुर्गा यासह विविध प्रदेशातील पक्ष कार्यकर्त्यांनी शिवकुमार यांच्या समर्थनात रॅली काढली, त्यांचे फोटो हातात घेतले आणि त्यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून घोषित करत घोषणा दिल्या.
काही समर्थकांनी तर असा इशाराही दिला की जर शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदी बढती दिली नाही तर राज्य काँग्रेस पक्ष अस्थिर होऊ शकतो.