
न्यायालयात सुनावणी होणे बाकी असताना विलेपार्ले पूर्व येथील जैन मंदिरावर पालिकेने बुलडोझर फिरवल्याने जैन बांधवांनी संतप्त होत मोर्चा काढला. दरम्यान, देरासरवर कारवाई केल्याप्रकरणी वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगेंची प्रशासनाकडून हकालपट्टी करण्यात आली.
विलेपार्ले पूर्व येथे कांबळीवाडी येथील 30 वर्षे जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन देरासर मंदिर आहे. या मंदिरावर पालिकेच्या माध्यमातून बुधवारी तोडक कारवाई करण्यात आली. महापालिकेने या मंदिराबाबत एक नोटीस बजावली होती. याविरोधात न्यायालयात जैन बांधवांकडून याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी 17 एप्रिलला निश्चित असताना 16 जुलैलाच पालिकेने मंदिरावर कारवाई करून मंदिर पाडले. त्यामुळे जैन बांधवांनी आज पालिका प्रशासनाच्या कारवाईविरोधात विलेपार्ले पश्चिम येथून मोर्चा काढला.
सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांचा आंदोलनाला पाठिंबा
पालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत 7 मार्च रोजी 2022 रोजी संपल्यानंतर पालिकेचा कारभार राज्य सरकारच्या सूचनेनुसार सुरू आहे. असे असताना सत्ताधारी पक्षामधीलच मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अळवणी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
सरकारला समाजात शांतता नकोय का? – वडेट्टीवार
जैन समाज हा सहिष्णू आहे. असे असताना त्यांचे जुने मंदिर तोडण्यात आल्याची कारवाई संतापजनक असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. सरकारकडून अल्पसंख्याकांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. सरकारला समाजात शांतता नकोय का?, असा सवालही त्यांनी केला. तर पालिकेची कारवाई म्हणजे एक षड्यंत्र असल्याचा आरोप काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केला.