वाल्मीक कराडची कारागृहात शाही बडदास्त, कारागृह अधिकारी धनसिंग कवाळे निलंबित

संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडची जिल्हा कारागृहात रवानगी म्हणजे नाटकच ठरले. सासुरवाडीतील जावयाप्रमाणेच कारागृहात त्याची शाही बडदास्त ठेवली जात असल्याचे समोर आले. त्यामुळे कारागृहाचा तात्पुरता पदभार असलेल्या धनसिंग कवाळे या तुरुंग अधिकाऱ्यास आज तडकाफडकी निलंबित करण्यात आले. याबाबत तुरुंग प्रशासनाचे उपमहानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दुजोरा दिला आहे.

दीड महिन्यापूर्वी काही दिवसांसाठी धनसिंग कवाळे या तुरुंग अधिकाऱ्याकडे बीड कारागृहाचा पदभार सोपविण्यात आला होता. या कालावधीत कारागृह महासंचालक कार्यालयातील पथक अचानक कारागृहाची तपासणी करण्यासाठी आले होते. या वेळी नातेवाईकांऐवजी इतर लोक कैद्यांना भेटत असल्याचे समोर आले. तसेच काही गंभीर त्रुटीदेखील आढळून आल्यामुळे वरिष्ठ तुरुंग अधिकारी धनसिंग कवाळे यांचे निलंबन करण्यात आले. दरम्यान, कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन अनेक वर्षांतील पहिलीच घटना मानली जात आहे.

कराडवरील कारवाई म्हणजेच नाटकाचा एक भाग आहे. देशमुख हत्याकांडाचा खेळखंडोबा झाला असून पोलिसांना अद्यापही फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करता आलेली नाही. ही बाब पोलिसांसाठी आणि गृह खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांसाठी लाजिरवाणी आहे. जेलमध्ये असूनही कैदी ‘राजयोग’ भोगतोय आणि पालकमंत्री अजित पवार फुशारक्या मारत राज्यभर कारभाराचा डंका वाजवत असल्याची चर्चा होत आहे.

पॅनिक अ‍ॅटॅक आल्याने आका रुग्णालयात

मकोका कायद्या अंतर्गत कारागृहात असलेल्या वाल्मीक कराडला शनिवारी अचानक पॅनिक अ‍ॅटॅक आल्यानंतर कारागृह प्रशासनाची धावपळ उडाली. आरोग्य पथक कारागृहात दाखल झाले. कराडच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यात याची शुगर वाढल्याचे निदान झाल्याचे प्रशासनाला कळवून त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथेही त्याला ‘राजेशाही’ उपचार देण्यात येतात, असे समोर आले आहे.