
भाजपचे ‘लाडके’ मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो एका महिलेला पाठविल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आहे. मात्र गोरे यांनी आज मीडियासमोर बोलताना आपल्याला न्यायालयाने निर्दोष सोडल्याचा दावा केला. त्यावर पीडित महिलेने प्रचंड संताप व्यक्त केला असून ‘‘गोरे हे अर्धसत्य सांगून मीडियाची दिशाभूल करत आहेत. हा अतिशय लबाड व नालायक माणूस आहे. गोरेंमुळे मला नाहक त्रास सहन करावा लागत आहे,’’ असे पीडितेने म्हटले आहे. दरम्यान, ‘‘17 मार्चपासून विधान भवनासमोर मी आमरण उपोषण सुरू करणार आहे. आपली बदनामी थांबत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील,’’ असा इशारा पीडित महिलेने दिला आहे.
जयकुमार गोरे यांनी मीडियासमोर आपली बाजू मांडली. ‘‘आपली या प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आपण फोटो पाठवले नाहीत,’’ असा दावा गोरे यांनी केला. यावर पीडित महिलेने प्रचंड संताप व्यक्त केला आहे. हा अतिशय लबाड आणि नालायक माणूस आहे ‘‘मी चुकलो, मला माफ करा आणि मला यातून बाहेर काढा, मी परत तुम्हाला त्रास देणार नाही,’’ असा लेखी माफीनामा कोर्टात दंडवत घालून दिल्यामुळे निर्दोष मुक्तता झाली, हे गोरे यांनी सांगायला हवे होते. दरम्यान, ‘‘गोरे यांनी मला पाठवलेले विवस्त्र फोटो न्यायालयाच्या ताब्यात आहेत. ते फोटो काय त्यांच्या बारशाचे आहेत का?’’ असा सवाल या महिलेने केला आहे. त्याच वेळी ‘‘या प्रकरणाच्या अनुषंगाने सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा उल्लेख कोणी करू नये,’’ अशी विनंतीही या महिलेने केली आहे.