जय शहा यांना आयसीसी अध्यक्षपदाचे वेध; श्रीलंकेतील आगामी बैठकीत निर्णयाची शक्यता

क्रिकेट जगतातील आर्थिक महासत्ता असलेल्या बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना आता आयसीसीच्या अध्यक्षपदाचे वेध लागले आहेत. सध्याची स्थिती पाहता त्यांनी अध्यक्षपदासाठी आपला दावा केल्यास ते बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता आहे, मात्र याबाबत श्रीलंकेत होणाऱया आयसीसीच्या बैठकीनंतरच चित्र स्पष्ट होईल.

हिंदुस्थानचे गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र असलेले जय शहा 2019 पासून बीसीसीआयच्या सचिवपदी विराजमान झाले आहेत. सध्या बीसीसीआय ही आयसीसीला सर्वाधिक आर्थिक हिस्सा देणारी क्रिकेट संघटना असल्यामुळे हिंदुस्थानी क्रिकेटची जागतिक स्तरावर प्रचंड ताकद वाढली आहे. त्यामुळे जय शहा यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाची धुराही सांभाळावी, असे मत समोर येऊ लागले आहे. याबाबत जय शहा यांनी अद्याप आपली भूमिका मांडली नसली तरी ते नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत आयसीसीवर नाराज आहेत. ती नाराजी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आणि हिंदुस्थानी क्रिकेटचा तिरंगा आयसीसीवर पुन्हा एकदा फडकाविण्यासाठी जय शहा यांना तयार केले जात आहे. श्रीलंकेत होणाऱया बैठकीत आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची घोषणा होईल आणि तेव्हाच जय शहा यांच्याबाबतही भूमिका स्पष्ट केली जाईल. येत्या नोव्हेंबर महिन्यात अध्यक्षपदाच्या निवडणुकीची शक्यता आहे. जर जय यांचे नाव निश्चित झाल्यास ते आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष असतील. सध्या न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले अध्यक्ष आहेत.

अध्यक्षपदाचा कार्यकाळ बदलला
आयसीसी अध्यक्षांच्या कार्यकाळात काही बदल करण्यात आला आहे. आयसीसीच्या घटनेप्रमाणे एखादी व्यक्ती तीन वेळा अध्यक्ष होऊ शकत होती आणि प्रत्येक कार्यकाळ हा दोन वर्षांचा असायचा, पण या नियमात दुरुस्ती करण्यात आली असून आता एखादी व्यक्ती दोनदाच अध्यक्ष होऊ शकते आणि त्यांचा प्रत्येक कार्यकाळ हा तीन वर्षांचा असेल.