>> निलय वैद्य
सन 1853 मध्ये इंग्रजांनी मुंबई ते ठाणे असा रेल्वेमार्ग तयार केला. याविषयी प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ नावाचा मोठा रोचक ललित स्तंभ लिहिला आहे. जमशेठजी आणि शंकरशेठ यांची दूरदृष्टी अचूक हेरत त्यांनी या लेखनात मुंबई रेल्वेविषयी लिहिताना या दोन शिल्पकारांचा योग्य सन्मान केला आहे. पैकी जगन्नाथ शंकरशेठ हा मुंबईच्या प्रगतीसाठी झटणारा मराठी माणूस. या हरहुन्नरी महात्म्याचे जीवनचरित्र मांडणारे ‘आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकार नामदार जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ’ हे अमर शेंडे लिखित पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी प्रकाशित केलं आहे. हे पुस्तक मुंबई महानगराचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांच्या कर्तृत्ववान जीवनावर प्रकाशझोत टाकणारे आहे.
तसं पाहिलं तर नाना शंकरशेठ यांच्या जीवनावर आधारित अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. मग प्रश्न पडतो की, हा पुस्तकप्रपंच परत एकदा कशासाठी? यावर साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे म्हणतात, लेखक अमर शेंडे यांनी लिहिलेलं हे पुस्तक केवळ नानांचे चरित्र नसून एकापरीने मुंबई शहराचा शैक्षणिक, सामाजिक, राजकीय इतिहास आहे. यात नानांचा जीवन प्रवास तर आहेच, पण इंग्रज दरबारी असलेलं नानांचं वजन, मुंबई शहराविषयी त्यांना असलेली कळकळ, त्यांनी कोणताही स्वार्थ मनात न बाळगता तनमनधन खर्चून शहराचा केलेला विकास हे सारं थक्क करणारं वर्णन आलेलं आहे, हे विशेष.
नानांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी झाला, तर मृत्यू 31 जुलै 1865 रोजी झाला. त्यांना 62 वर्षांचे आयुष्य लाभले. पैकी सुमारे चाळीस वर्षे ते सािढय होते. या चार दशकांच्या कालावधीत नानांनी केलेलं कार्य पाहिलं तर खरंच अचंबित व्हायला होतं. त्यांच्या आवाक्याचा अंदाज लागू शकतो. या पुस्तकात लेखक अमर शेंडे यांनी अठरा प्रकरणांच्या सहाय्याने नानांचं व्यक्तिमत्त्व रेखाटण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. यात स्त्राr शिक्षणाचे अग्रदूत, स्वभाषेचा अभिमान, बॉम्बे असोसिएशन, हिंदुस्थानातील दळणवळण, नाना कायदेमंडलात, अनंतात विलीन, जिवंतपणी स्मारक ही प्रकरणे बहुआयामी आहेत. हे पुस्तक वाचून झाल्यावर एका गोष्टीची खात्री पटते की, प्रबोधनकारांनी जो नानांचा आपल्या स्तंभ लिखाणात गौरव केला तो यथायोग्य आहे.