जगबुडी नदीला पूर, वशिष्ठी,कोदवली नद्यांनीही इशारा पातळी ओलांडली; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

अतिवृष्टीने कोकणाला झोडपून काढले आहे. खेडमधील जगबुडी नदी आणि संगमेश्वरमधील गडनदीला पूर आला आहे. त्यामुळे बाजारपेठेसह घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. चिपळूणातील वशिष्ठी आणि राजापूरातील कोदवली नदीनेही इशारा पातळी ओलांडल्याने त्या शहरांनाही पुराचा धोका निर्माण झाला आहे. जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे खेडमधील 125 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

जगबुडी नदीची धोका पातळी 7 मीटरवर आहे. सध्या जगबुडी नदी धोक्याची पातळी ओलांडून 10 मीटरवर वाहत असल्याने खेड शहरात हाहाःकार उडाला आहे. खेड शहराला पुराने वेढा घातला आहे. जगबुडी आणि नारिंगी नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टर भातपीक पाण्याखाली गेले आहे. दापोली आणि मंडणगड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. बोरघर येथे मुंबई-गोवा महामार्ग बंद झाला. नदीतील गाळ न काढल्यामुळे पुराचा वेढा बसल्याची चर्चा आहे.

दापोली मंडणगड या रस्त्यावर पालगड पवारवाडी पुलावरून पाणी जात आहे. छोट्या वाहनांना बंदी केली आहे. संगमेश्वर तालुक्यात कोंड आंबेड-डिंगणी- कर्जुवे, धामणी, कसबा, फणसवणे भागात जिल्हा परिषद रस्त्यावर पाणी भरले आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संगमेश्वरात सोनवी नदीचे पाणी बाजारपेठेत शिरले आहे. चिपळूणात मुंबई-गोवा महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती.