
आंध्र प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला वायएसआर काँग्रेस विरोधकांच्या इंडिया आघाडीत सामील होणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी नुकतेच दिल्लीत एका प्रदर्शनाचे आयोजन केले होते. जूनमध्ये राज्यात सत्तांतर होऊन तेलुगू देसम- जनसेना आणि भाजपने सत्ता स्थापन केली.
या सव्वा ते दीड महिन्याच्या काळात सत्तारुढ पक्षांनी विशेषतः तेलुगू देसमने वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केल्याचा जगनमोहन यांचा आरोप आहे. आपल्या 31 कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा. तर छळवणुकीने 35 जणांनी आत्महत्या केल्याचा पक्षाचा दावा आहे. यावर आधारित ‘रक्त चरित्र’ नावाची पुस्तिकाच या वेळी प्रकाशित करण्यात आली. यावेळी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. त्यामुळे वायएसआर काँग्रेस इंडिया आघाडीत सामील होणार अशी चर्चा आहे. दरम्यान, वायएसआर काँग्रेसचे लोकसभेत चार खासदार आणि राज्यसभेत 11 सदस्य आहेत.