जगनने आंध्रला ब्लँक चेक सारखं अदानींना दिलं, बहीण शर्मिला यांनी भावावर साधला निशाणा

उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर लाचखोरीच्या आरोपांदरम्यान आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (एपीसीसी) अध्यक्षा वायएस शर्मिला यांनी शुक्रवारी त्यांचा भाऊ आणि माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शर्मिला म्हणाल्या आहेत की, जगनने आंध्रला ब्लँक चेक सारखं अदानींना दिलं.”

शर्मिला यांनी जगन मोहन रेड्डी यांच्यावर जागतिक स्तरावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, ”त्याने आंध्र प्रदेश आणि येथील लोकांचे हित 1,750 कोटी रुपयांच्या लाचेच्या बदल्यात अदानींना दिले. जगनच्या भ्रष्टाचाराने केवळ राज्याचीच नव्हे तर संपूर्ण वायएसआर कुटुंबाची प्रतिष्ठा डागाळली आहे.”

शर्मिला म्हणाल्या की, अदानी समूह गुजरातमध्ये 1.99 रुपये प्रति युनिट दराने वीज विकत आहे, तर आंध्र प्रदेशमध्ये हीच सेवा 2.49 रुपयांनी देण्यात येत आहे. त्या म्हणाल्या की, अदानी समूहासोबत 25 वर्षांच्या करारामुळे आंध्र प्रदेशातील जनतेवर 1 लाख कोटी रुपयांचा बोजा पडला आहे.

त्या म्हणाल्या की, अदानी यांनी देशाचा अपमान केला असून जगन मोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशचा अपमान केला आहे. या वीज करारात जगनला 1750 कोटी रुपये मिळाले. दुसरीकडे डिस्कॉम्सच्या माध्यमातून 17 हजार कोटी रुपयांचा बोजा जनतेवर लादला जात आहे. कदाचित त्याचा संबंध नसेल पण ही सध्याची वस्तुस्थिती आहे.